पुणेकरांसाठी खुशखबर ! स्वारगेटसह पाच एसटी डेपो होणार इलेक्ट्रिक

पुणेकरांसाठी खुशखबर ! स्वारगेटसह पाच एसटी डेपो होणार इलेक्ट्रिक

पुणे : एसटीच्या पुणे विभागातील पाच बस डेपो हे पीएमपी प्रमाणेच संपूर्णपणे इलेक्ट्रिक करण्यात येणार असून, येथील संचलन, प्रवासी सेवा आणि इन्फ्रास्ट्रक्चर देखील पूर्णत: इलेक्ट्रिकच असणार आहे. यात पुण्यातील महत्त्वाचे असलेले स्वारगेट, इंदापूर, मंचर, आळंदी आणि सांगवी या आगार/ बसस्थानकांना आगामी काळात लवकरच इलेक्ट्रिक डेपो म्हणून तयार केले जाणार आहे. एसटीच्या कार्यप्रणालीमध्ये दिवसेंदिवस बदल होत असून, पीएमपीप्रमाणेच एसटी आता कात टाकून नवसंजीवनी प्राप्त करीत आहे. पीएमपी प्रशासनाने ताफ्यात ई-गाड्यांचा समावेश केल्यानंतर लगेचच संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरसह ताफ्यातील पाच डेपो इलेक्ट्रिक केले. त्यानुसार पीएमपीचे बाणेर, वाघोली, निगडी, भेकराईनगर आणि पुणे स्टेशन हे पाच डेपो इलेक्ट्रिक करण्यात आले आहेत. आता एसटी देखील पीएमपीच्याच पावलावर पाऊल टाकत ई-डेपो उभारत आहे.

ई-डेपोतून नियोजन

  • स्वारगेट डेपोमधून 137, सांगवीतून 30, इंदापूरमधून 29, मंचरमधून 27 तर आळंदीमधून
    28 अशा पुणे विभागात एकूण 251 ई-गाड्या धावणार आहेत.

ताफ्यातील ई-गाड्या

  • ई-शिवनेरी बस – 44
  • ई-शिवाई बस – 20
  • एकूण ई-बस – 64

अशी सुरू आहे कार्यवाही

एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ताफ्यात दाखल होणार्‍या इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी ई-डेपो बनविण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात असलेली निविदा प्रक्रिया संपन्न झाली असून, ई-ट्रान्स. प्रा. लि. (एमएसआर) या कंपनीला हे काम दिले आहे. त्यासंदर्भातील करार देखील नुकताच संपन्न झाला आहे. कंपनी आणि एसटीचे अधिकारी यांची एकत्रित समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमार्फत निश्चित केलेल्या आगारांच्या जागेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ई-डेपो उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news