पेन्शनला ‘डीएसएम’चा अडथळा! डीएसएम आहे तरी काय? | पुढारी

पेन्शनला ‘डीएसएम’चा अडथळा! डीएसएम आहे तरी काय?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील खासगी अनुदानप्राप्त 16 शाळांमधील मुख्याध्यापकांनी डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट अर्थात डीएसएम अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. असे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचा सेवानिवृत्ती वेतनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवता येणार नसल्याचे वेतन व भविष्यनिर्वाह निधी वेतन पथकाचे अधीक्षक संजय गंभीरे यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविले आहे. त्यामुळे पेन्शनसाठी संबंधित मुख्याध्यापकांना डीएसएम प्रमाणपत्राचा अडथळा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गंभीरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार,विद्यालयांमधून सेवानिवृत्त झालेले अथवा सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक यांचे संस्थेकडून या कार्यालयास त्यांचे सेवानिवृत्ती वेतन मंजुरीसाठी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

या प्रस्तावांची छाननी केली असता संबंधित प्रस्तावांमध्ये मुख्याध्यापक यांनी डीएसएम अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. तरी संबंधित शाळांमधील मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र मिळताच तत्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावे. संबंधित प्रमाणपत्र या कार्यालयास सादर न केल्यास मुख्याध्यापकांचे सेवानिवृत्ती वेतन मंजुरीबाबतचे प्रस्ताव महालेखापाल, मुंबई कार्यालयाकडे सादर करता येणार नाही. संबंधित प्रमाणपत्रामुळे सेवानिवृत्ती वेतन मंजूर न झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. तसेच सेवानिवृत्तीपूर्वी संबंधित प्रमाणपत्र प्राप्त केले नसल्यास मुख्याध्यापक पदाचा लाभ अनुज्ञेय ठरत नाही तसेच घेतलेले वेतन वसूलपात्र राहील, असा इशारादेखील देण्यात आला आहे.

डीएसएम अभ्यासक्रम आहे तरी काय ?

हा अभ्यासक्रम मुख्याध्यापकांचे कार्य किंवा त्यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत यासंदर्भातील हा अभ्यासक्रम आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक या विद्यापीठामार्फत हा अभ्यासक्रम चालवला जातो. मुख्याध्यापक पदासाठी पात्र असलेल्या कर्मचार्‍यांनी काम करत असतानाच हा अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे.

शाळांमध्ये कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांनी हा अभ्यासक्रम जर केला नसेल, तर त्यांना मुख्याध्यापक पदासाठी पात्र कसे करण्यात आले. शाळांमध्ये संबंधित मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र कसे असेल, व्यक्तिगत प्रमाणपत्रे कुणीही शाळेत ठेवणार नाही. हा अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाऐवजी विद्या प्राधिकरणाने घेणे गरजेचे आहे. मुख्याध्यापक पदासाठी आवश्यक कौशल्ये विद्या प्राधिकरण शिक्षकांना देऊ शकत नाही का हा खरा प्रश्न आहे.

– एक मुख्याध्यापक, हवेली तालुका.

हेही वाचा

Back to top button