पुणे :पुढारी वृत्तसेवा : हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणार्या पुणे मेट्रो लाइन 3 या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या वेगात भर घालण्यासाठी आणि एकूणच पुणे शहराची गतिमानता वाढविण्यासाठी 'पुणेरी मेट्रो'ची पहिली ट्रेन पुण्यात दाखल झाली आहे.
अलस्टॉम या कंपनीने आपल्या श्रीसिटी (आंध्र प्रदेश) येथील कारखान्यात विकसित केलेली ही तीन डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ('मेड इन इंडिया') आहे. कित्येक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली ही पहिली पुणेरी मेट्रो ट्रेन रविवारी 2 जून रोजी पुणे मेट्रो लाइन 3 च्या माण येथील डेपोमध्ये दाखल होईल, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडतर्फे देण्यात आली.
पुणे मेट्रो लाइन 3 प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन डबे असलेल्या एकूण 22 ट्रेनचा संच उपलब्ध करून देण्याचे या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. ताशी 85 किलोमीटर इतक्या अधिकतम वेगाने धावू शकणार्या या प्रत्येक ट्रेनमधून एका फेरीत तब्बल 1000 (एक हजार) प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.
पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर म्हणाले, पुणे मेट्रो लाइन 3 प्रकल्पाचे काम एका शाश्वत वेगाणी पूर्णत्वाकडे सरकत आहे. अशातच या प्रकल्पासाठीची पहिली ट्रेन येथे प्रत्यक्ष येऊन दाखल झाल्याने सर्वांचा उत्साह आणखी वाढला आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर उपयोगात आणल्या जाणार्या सर्व ट्रेन्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. या मार्गावरील सर्व ट्रेन थर्ड रेल प्रणालीचे अवलंब करून धावणार आहेत. तसेच, त्यांना अधिक कार्यक्षम आणि ऊर्जावान बनविण्यासाठी त्यामध्ये 'रिजनरेटिव्ह ब्रेकिंग' यंत्रणेचादेखील समावेश करण्यात आलेला आहे. पुणेकरांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने या ट्रेन्सची रचना आदर्श आहे.
हेही वाचा