पोल्ट्री व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’; चिकन दरवाढीमुळे खवय्यांमध्ये मात्र नाराजी

पोल्ट्री व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’; चिकन दरवाढीमुळे खवय्यांमध्ये मात्र नाराजी

मंचर : पुढारी वृत्तसेवा : पोल्ट्री व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, ब्रॉयलर चिकन दरवाढीमुळे खवय्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 15 दिवसांपूर्वी 220 रुपये किलोने मिळणारे ब्रॉयलर चिकन आता 250 रुपये किलोने मिळत आहे. अंड्यांच्या दरातसुध्दा वाढ झाली असून, अंड्यांचे दर 600 रुपये शेकड्यापर्यंत गेले आहेत, तर डझनची विक्री 84 रुपयांनी होत आहे.

सध्या तापमान 40 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे कोंबड्या मरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने बहुतांश पोल्ट्री फार्म बंद आहेत. ग्रामीण भागात विवाह समारंभ, वाढदिवस, कांदा काढणी व द्राक्षबागांच्या कामाकरिता आलेल्या मजुरांमुळे चिकनला सध्या उठाव असून, घाऊक बाजारात मालाची कमतरता जाणवत आहे.

एवढ्या वर्षात पहिल्यांदाच जिवंत ब्रॉयलर कोंबडीचा दर प्रतिकिलो 140 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, चिकन खवय्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी 220 रुपये किलोने मिळणारे ब्रॉयलर चिकन आता 250 रुपयांवर गेले आहे.

ब्रॉयलर कोंबडी तयार करण्यासाठी एक किलोला 80 ते 90 रुपये खर्च येतो. कोंबडीचे एक दिवसाचे पिल्लू 50 रुपयांपर्यंत आहे. सध्या सोयाबीन, मक्याचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे कोंबडी तयार करण्यासाठीच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. परिणामी कंपनी व्यवस्थापनाने ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळेच ब्रॉयलर चिकन प्रथमच 250 रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकनचे व्यावसायिक इसाक शेख, घोडेगाव येथील ब्रॉयलर कोंबडीचे होलसेल व्यापारी जावेद मिस्त्री आणि फिरोज मिस्त्री यांनी दिली.

चिकन 300 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागात ब्रॉयलर कोंबडीची 260 रुपये किलोच्या पुढेही विक्री होत आहे. शहरी भागातही चिकन महाग झाले आहे. मालाची कमतरता जाणवल्यास चिकन 300 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे निरगुडसर येथील पोल्ट्री व्यावसायिक प्रकाश वळसे पाटील यांनी सांगितले.

अंडी, मटणाच्या दरातही वाढ

चिकनचे दर अचानक वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांना 150 ते 170 रुपयांत थाळी देणे मुश्किल होणार आहे. अंड्यांच्या दरातसुध्दा वाढ झाली असून, अंड्यांचे दर 600 रुपये शेकड्यापर्यंत गेले आहेत, तर डझनची विक्री 84 रुपयांनी होत आहे. बकर्‍याच्या मटणाला मागणी टिकून असल्याचे दिसून येत आहे. बकर्‍याच्या मटणाचे दर 660 ते 700 रुपये किलोप्रमाणे असल्याची माहिती एकलहरे येथील चॉईस मटण व्यावसायिक व बकर्‍याचे व्यापारी शेखर कांबळे यांनी सांगितली.

एसी पोल्ट्री फार्मिंग वाढतेय

सध्या एसी पोल्ट्रीनिर्मिती कळंब परिसरामध्ये वाढत आहे. यामध्ये तिरंगा उद्योग समूहाचे नितीन बाळू भालेराव, सचिन सूर्यकांत कानडे, प्रमोद पिंगळे, शंतनु भालेराव आदींनी एसी पोल्ट्री फार्म तयार
केले आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news