

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : जनावरांना ओला चारा म्हणून, वापरात येणारे उसाचे वाडे आता उसाचा हंगाम संपत आल्याने बंद झाले आहे. तर वाड्याला पर्याय असणारे मका, हत्तीघास या गवताची लागणदेखील कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे चार्याचा भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. वाल्हे, हरणी, आडाचीवाडी, मांडकी, दौंडज, राख, नावळी, वागदरवाडी, सुकलवाडी आदी परिसरात कडब्याला मोठा भाव मिळत आहे. कडबा शेकडा 3500 ते शेकडा 5000 रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे. चारा महागल्याने दुधाचा प्रतिलिटर निर्मिती खर्चही वाढणार आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून उसाचे वाडे ओला चारा म्हणून उपलब्ध होता. मात्र, मार्चच्या मध्यानंतर ओल्या चार्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली. मागील पंधरवड्यात अवकाळीच्या धास्तीने अनेक बाहेरगावच्या व्यापार्यांनी या परिसरात येऊन, कमी- जास्त बाजारभाव ठरवून मोठ्याप्रमाणावर कडबा खरेदी केला. बाहेरील जिल्ह्यात कडबा गेल्याने स्थानिक पशुपालकांना कडबा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. परिणामी, उपलब्ध कडब्याला भाव आला आहे.