

पुणे : अमेरिकन फेडरलने स्थिर ठेवलेले व्याज दर, डॉलर मजबूत झाल्याने सोन्यावरील कमी झालेले आकर्षण आणि उच्च दरामुळे गुंतवणूकदारांनी सुरू केलेली नफा वसुली, यामुळे मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोमवारी (दि. 23) सोन्याच्या भावात तोळ्यामागे 10 ते 12 हजार रुपये, तर चांदीच्या दरात 32 हजारांनी घसरण झाली. एकंदरीतच, युद्ध सुरू झाल्यापासून सुमारे 24 दिवसांत सोने दरात 24 हजारांची घसरण झाली आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. सोमवारी सोन्याच्या दरात तोळ्यामागे 12 हजारांची घट होऊन तीन टक्के जीएसटी वगळून दर 1 लाख 35 हजार 141 वर आले, तर चांदी किलोमागे 32 हजारांनी उतरून तीन टक्के जीएसटी वगळून 2 लाख 1 हजार 500 रुपयांवर आली. सकाळच्या सत्रात झालेली ही घट अल्पजीवी ठरली. त्यानंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ होऊन सायंकाळपर्यंत सोन्याचे प्रतितोळ्याचे दर 1 लाख 39 हजार 569 रुपये, तर चांदीचे किलोचे दर 2 लाख 19 हजार 260 रुपयांवर पोहोचले होते. सायंकाळपर्यंत दर वाढल्यानंतरही रविवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे सात हजार, तर चांदीच्या प्रतिकिलो भावात 13 हजारांची घट झाली.
43 वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण
युद्धापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा प्रतिऔंस (28.34 ग्रॅम) दर 5,559.51 डॉलर्सवर गेला होता. भारतीय चलनात ही रक्कम पाच लाख रुपये होते. त्यानंतर त्यात 5,200 डॉलर्सपर्यंत घट झाली. सोमवारी सोन्याचे भाव 3.8 टक्क्यांनी घसरून 4,352 डॉलर्स प्रतिऔंसवर आले आहेत. भारतीय चलनात ही रक्कम 4 लाख 4 हजार रुपये होते. गत 43 वर्षांतील (1983 पासून) सोन्याच्या भावात झालेली ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरली आहे.