पिंपरखेड : फ्लॉवरच्या पिकात सोडल्या बकऱ्या; तरकारीचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल

पिंपरखेड : फ्लॉवरच्या पिकात सोडल्या बकऱ्या; तरकारीचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील बेटभागात पालेभाज्या, फळभाज्यांना कवडीमोल दर मिळत असल्याने तरकारी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाची काढणी, वाहतुकीचा खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, शेतातील काढणीस आलेल्या फ्लॉवर, कोबीमध्ये बकर्‍या सोडण्याची दुर्दैवी वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

खरीप हंगामातील अतिवृष्टीने शेतकरी हैराण झाले असताना शेतकर्‍यांना शेतात शेतमाल घेता आला नाही. त्यानंतर शेतकर्‍यांनी पिकांचे नियोजन करीत फ्लॉवर, कोबी, धना, मेथी आदी पीक घेतले. सुरुवातीच्या वातावरणाचा प्रादुर्भावावर महागडी औषध फवारणी करीत शेतकर्‍यांनी चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेने फ्लॉवर, कोबीचे उत्तम पीक घेतले.

परंतु, पीक काढणीस आले असताना बाजारभाव कोसळले असून, या पिकाला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कोबीच्या दरात वाढ न झाल्याने शेतकर्‍यांना शेतात मेंढ्यांचे कळप तसेच जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकर्‍यांनी काढणी न करताच शेतात मेंढ्यांचे कळप, जनावरे सोडून पीक चारून शेत मोकळे केले.

शेतकरी दुहेरी संकटात
पावसाळ्यात अतिवृष्टीने शेतकरी पुरता संकटात सापडला होता. शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे भांडवल वसूल झाले नाही. त्यानंतर मोठ्या अपेक्षेने शेतकर्‍यांनी कोबी व इतर तरकारी पिकांची लागवड केली. सध्या काढणीस आलेल्या शेतकर्‍यांच्या या शेतमालाला कवडीमोल दर मिळत असून, गुंतविलेले भांडवल वसूल होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news