कांदारोपांवर शेळ्या-मेंढ्यांचा ताव

कांदारोपांवर शेळ्या-मेंढ्यांचा ताव

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आता कांदा लागवड होऊन उरलेल्या कांदारोपांवर शेळ्या-मेंढ्या, जनावरे ताव मारताना दिसत आहेत. सध्या निर्माण झालेल्या चाराटंचाईत यामुळे मेंढपाळांना मोठा दिलासा मिळाला आहे. पारगाव, शिंगवे परिसरात रब्बी हंगामातील कांदा लागवडी आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यंदा लागवडी पूर्ण होऊन प्रथमच कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडे कांदारोपे मोठ्या प्रमाणात उरली आहेत. त्यामुळे आता अनेक शेतांमध्ये कांदारोपे सोडून दिलेली दिसत आहेत.

दरवर्षी कांदा लागवडीच्या वेळी शेतकर्‍यांना रोपांची टंचाई भासते. ऐनवेळी रोपांसाठी शेतकर्‍यांना धावपळ करावी लागते. रोपे विकत घेण्यासाठी जादा पैसे देखील मोजावे लागतात. मात्र, यंदा परतीच्या पावसातून कांदारोपे वाचली. त्यामुळे सर्वच शेतकर्‍यांकडे कांदारोपे लागवड होऊन उरली आहेत.

परिणामी, अनेक शेतकर्‍यांनी कांदारोपे सोडून दिली आहेत. सोडून दिलेल्या कांदारोपांवर आता मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्या, जनावरे ताव मारताना दिसत आहेत. या परिसरात सध्या चाराटंचाईचे संकट मेंढपाळांसमोर आहे. परंतु, आता कांदारोपे चरण्यासाठी मेंढपाळांना मिळू लागल्याने मेंढपाळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news