पुणे : पुढारी वृत्तसेवा : पूजाने दुष्काळावर रचलेली कविता फेसबुकवर पोस्ट केली अन् तिच्या कवितेला रसिकांकडून पसंतीची पावती मिळाली. पूजाप्रमाणे आताच्या घडीला अनेक तरुण कवींनी सोशल मीडियाचा रसिकांपर्यंत कविता पोहोचविण्यासाठी सकारात्मक वापर सुरू केला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे कविता सादर करण्यासह यू-ट्युब चॅनेलवर कवितांचे व्हिडीओ अपलोड करत आहेत. त्यांच्या या काव्याच्या दुनियेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एखादी रोमँटिक कविता असो वा स्त्रियांचे जगणे मांडणारी कविता… तरुणांच्या काव्यजगताशी रसिकही जोडले जात आहेत. काही कवींनी आपले अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे, तर काहींनी फेसबुक, इन्स्टाग्राम पेज… सोशल मीडियाने तरुण कवींच्या कवितेला नवा आकार दिला असून, तरुण कवींनी आपल्या कवितांनी नवी ओळख निर्माण केली आहे.
कवितेच्या दुनियेत आता अनेक तरुण कवींनी पाऊल ठेवले आहे. नव्या विषयांवर सामाजिक प्रबोधनात्मक विषयांवर ते कविता करू लागले आहेत. फक्त कवितासंग्रहातून कवितेला वाट देण्यापेक्षा तरुण कवी सोशल मीडियाद्वारे आपली कविता लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. कोणी रिल्सद्वारे आपली कविता स्वत:च्या आवाजात इन्स्टाग्रामद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवत आहे, तर कोणी यू-ट्युब व्हिडीओद्वारे कविता लोकांपर्यंत मांडत आहे. काहीजण तर फेसबुक आणि इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे कवी कवी संमेलने आणि कविता अभिवाचन कार्यक्रमही घेत आहेत. गुरुवारी (दि. 21) साजर्या होणार्या जागतिक कविता दिनानिमित्त दै. पुढारीने या ट्रेंडबद्दल जाणून घेतले.
याविषयी कवी सारंग पांपटवार म्हणाले, माझ्या कवितांना एक वेगळी वाट मिळावी, यासाठी मी इन्स्टाग्राम रिल्सद्वारे आपल्या कविता रसिकांसमोर मांडू लागलो.
माझ्या याच कवितांच्या रिल्सला चांगले व्ह्युव्ज मिळत असून, रसिकांची दिलखुलास दादही मिळत आहे. सोशल मीडियामुळे जगभरातील रसिक माझ्या कवितांशी जोडले गेले आहेत. साठ सेकंदांच्या कालावधीत रिल्सच्या माध्यमातून कविता पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. कवितांचा विषय आजच्या तरुणांना भिडावा, त्यांना त्यांचा वाटावा असा माझा प्रयत्न असतो. मी माझ्याच कवितांना चाल लावून त्या पोस्ट करतो. बदलणार्या माध्यमांमध्ये मराठी भाषेचे वर्चस्व कायम राहावे, तिचा गोडवा, तिची सहजता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, हा प्रयत्न आहे.
हेही वाचा