

पुणे: समाज माध्यमांवर तसेच इतर माध्यमांतून काश्मिरींना धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी सरहद संस्थेकडे येत आहेत. सध्याचे वातावरण पाहता काश्मिरी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधिकार्यांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच समन्वयक म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सरहद संस्थेतील तरुणांकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवण्यात आले आहे.
पहलगाममधील झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुटीसाठी काश्मीरला गेलेले आणि तेथे परतलेले काश्मिरी विद्यार्थी महाराष्ट्रातील तसेच इतर भागांतील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. मात्र, पुण्यातील काश्मिरी तरुणांसाठी सध्या असुरक्षितचेचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाला यामध्ये लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.
सरहद ही संस्था गेली 30 वर्षे जम्मू आणि काश्मीरमधील विद्यार्थी आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करत आहे. संस्थेचे अनेक प्रकल्प काश्मीरमध्ये सुरू आहेत, तर पुण्यात जम्मू-काश्मीरमधील बहुसंख्य विद्यार्थी व युवक संस्थेशी जोडले गेले आहेत. गेले काही महिने काश्मिरींना लक्ष्य करण्याच्या काही घटना घडत आहेत.
ऑक्टोबर 2024 मध्ये दोन गंभीर प्रसंगांत भारती विद्यापीठ पोलिसांनी मदत केल्याने काही काश्मिरी मुलांचे प्राण वाचले होते. आताही पोलिसांकडून संरक्षण मिळावे, अशी मागणी आकीब भट, सिराजउद्दीन खान, आसिफ डर, सलीम रैना, मोहम्मद शफी यांनी पत्राद्वारे केली आहे.