गिरीश बापट यांचा शिपाई ते मुख्यमंत्र्यांपर्यंत लळा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना

गिरीश बापट यांचा शिपाई ते मुख्यमंत्र्यांपर्यंत लळा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आपल्याच घरातले कुणी गेले आहे इतका जिव्हाळा व प्रेम देऊन लढवय्या कार्यकर्ता व खासदार गिरीश बापट आपल्याला सोडून गेले. त्यांनी मंत्रालयातील शिपायापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना लळा लावला. सर्वसामा-न्यांचा कार्यकर्ता म्हणून ते जगले, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैकुंठ स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले, रिक्षावाल्याच्या खांद्यावर सहज हात टाकून खा. बापट त्याला आपलेसे करीत. त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून येऊन आपली छाप दाखवून दिली. ते पुण्यातील मोठे नेते होते. शहराचा इतिहास त्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. सर्वपक्षीय लोकांना हवेहवेसे वाटणारे असे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेले.

गिरीश बापट यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांसोबतच आम्हा भाजपच्या परिवारावरदेखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने 'पुण्याची ताकद गिरीश बापट' ही ओळख जनमानसात तयार केली होती. त्यांच्या जाण्याने पुणे पोरकं झाले आहे, आमचा मार्गदर्शक हरपला आहे.
                                                              – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.
                                                               – सुप्रिया सुळे, खासदार

गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांना पुणेकरांचे अलोट प्रेम मिळाले. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे.
                                                              – अजित पवार, विरोधी पक्ष नेते

पुण्याच्या जडणघडणीत स्व. गिरीश बापट यांचे मोलाचे योगदान आहे. केवळ कसबा पेठेतीलच नव्हे, तर प्रत्येक पुणेकराशी आपल्या कामाने जोडले गेलेले होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेकांशी जिव्हाळ्याचं नातं असलेले मैत्रीचे मोल जाणणारे, सच्चे कार्यकर्ते, प्रगल्भ राजकारणी आणि सुस्वाभावी माणूस गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
                                               – कृष्णकुमार गोयल, चेअरमन, कोहिनूर ग्रुप

आज भाजपची खूप मोठी शक्ती आपल्यातून निघून गेली आहे. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भाजपचा कार्यकर्ता किती प्रामाणिक असतो, त्याचे बापट उदाहरण होते.
                                           – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, कसब्याचे पाच वेळा आमदार, राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री ते पुण्याचे खासदार अशी विविध पदे भूषविलेल्या गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे शहर पोरकं झालं असून, विकासाच्या पातळीवर पुणे शहराची अपरिमित हानी झाली आहे.
                                        – प्रमोद भानगिरे, शहरप्रमुख शिवसेना, पुणे

माझे दीर्घकाळापासूनचे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री, पालकमंत्री आणि खासदार अशी उत्तम राजकीय वाटचाल करताना त्यांनी स्वतःचा कार्यकर्त्याचा पिंड मात्र सोडला नाही. विरोधी पक्षांशी वितुष्ट असता कामा नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी सदैव जपली.
                                   – मोहन जोशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

पक्षापलीकडे जाऊन मैत्रीचा जिव्हाळा आणि माणुसकीचे नाते जपणारे नेतृत्व हरपले. गिरिश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
                                                                      – डॉ. अमोल कोल्हे, खासदार

गेली 40 वर्षे राजकारणात मैत्री असणारा मित्र आज आम्हाला सोडून गेला, खूप दुःख होत आहे. आम्ही भलेही वेगवेगळ्या पक्षांतील असलो तरी आमचे मैत्रीपूर्ण संबंध घट्ट होते.
                                                  – अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

गिरीश बापट- कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व राजकीय पक्षांतील लोकांशी राजकारणापलीकडील मैत्री जपणारा दिलदार मित्र… भावपूर्ण श्रद्धांजली.
                                                                   – वंदना चव्हाण, खासदार

सामान्य माणसाशी संपर्क, साधेपणा आणि विरोधकांचेही कौतुक करण्याचा खुलेपणा असणारा कार्यकर्ता नेता! 40 वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास, गुणग्राहकता, चिकाटी, जनसंपर्क, प्रशासनावर पकड, यामुळे अनेकांचे लाडके ' गिरीशभाऊ ' होते.
                                           – मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी, जिल्हाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news