खोर : रिंगरोडचे काम तत्काळ मार्गी लावा : आमदार राहुल कुल

खोर : रिंगरोडचे काम तत्काळ मार्गी लावा : आमदार राहुल कुल
Published on
Updated on

खोर (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रास्तावित रिंगरोडचे काम शासनाने तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी हिवाळी विधानसभेत केली. लक्षवेधी सादर करताना आमदार राहुल कुल म्हणाले की, कोरोनानंतर पुणे शहरात वाहतुकीची कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. घराबाहेर पडल्यानंतर परत घरी कधी येऊ हे सांगता येत नाही. रिंगरोडसाठी सुमारे दीड हजार हेक्टर जमीन संपादन होणार आहे. संपादनाचे हे काम अतिशय संथगतीने चालू आहे.

वाहतूक समस्या कमी करायची असेल, तर मेट्रोप्रमाणेच रिंगरोडचे काम करणे अत्यावश्यक आहे. याचा फायदा पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड शहरांना होणार आहे. याशिवाय या मार्गाचे पूर्व व पश्चिम भागांमध्ये भूसंपादन होणार आहे. यासाठी किती रक्कम आवश्यक आहे व या रस्त्याचे काम कधीपर्यंत करणार आहोत, याची माहिती मिळणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) विकसित केल्या जाणार्‍या बहुप्रतीक्षित रिंगरोडच्या माध्यमातून शहरात येणारी जड वाहनांची वाहतूक इतर ठिकाणी वळवता येईल. वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे रिंगरोडचा प्रश्न लवकर मार्गी लावावा.

यासोबतच खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यामधून पाणी नेण्याचा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास जवळपास अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. तेव्हा खडकवासला कालवा ते फुरसुंगीपर्यंत बंद नळी कालवा तयार करून उपलब्ध जागेचा उपयोग वाहतुकीसाठी करावा, अशी मागणी आ. कुल यांनी केली आहे. या मागणीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी शंभूराजे देसाई म्हणाले की, या रस्त्यासाठी आपण 10 हजार 520 कोटी रुपये कर्ज घेत आहोत. डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news