

पुणे: स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा संघर्ष, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या त्यागाची सखोल माहिती काही जेन झींना असली, तरी अनेकांना मोजकीच नावे आणि घटना माहिती असल्याचे दै. 'पुढारी'ने केलेल्या संवादातून समोर आले.
मात्र, असे असले तरीही देशाविषयीचे प्रेम, अभिमान आणि देशभक्तीची भावना त्यांच्या मनात तितकीच ठाम असल्याचे दिसून आले. 'देशभक्ती म्हणजे केवळ सोशल मीडियावर पोस्ट, स्टेटस किंवा रील्स शेअर करणे नव्हे,' अशी स्पष्ट भूमिका या तरुणांनी मांडली. इतिहास समजून घेणे, संविधानाचा आदर करणे, सोशल मीडियावरील माहितीची सत्यता तपासणे आणि देशासमोरील प्रश्नांवर अभ्यासपूर्वक मत मांडणे, यातूनच देशप्रेमाची खरी जपणूक होऊ शकते, असा संदेश जेन झींनी दिला आहे.
शनिवारी (दि. १५) साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'ने जेन झींशी संवाद साधला. स्वातंत्र्याचा इतिहास जाणून घ्या, मिळालेल्या अधिकारांचे महत्त्व समजून घ्या, कर्तव्यांची जाणीव ठेवा आणि देशासाठी आपल्या परीने प्रत्यक्ष योगदान द्या, असे आवाहनही जेन झींनी जेन झींना केले आहे.
तन्वी जगताप : मला स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले योगदान याविषयी माहिती आहे. पण, माझ्या पिढीतील अनेकांना इतिहासाबाबत पुरेसे ज्ञान नाही. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि महापुरुषांच्या प्रयत्नांमुळेच आजची पिढी स्वातंत्र्य उपभोगत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता आणि इतिहासाचे भान असणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याचा अर्थ केवळ आपल्या मताचा अधिकार मिळणे एवढाच नसून, त्या अधिकाराचा जबाबदारीने वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
योगिनी देशमुख : आम्हा जेन झीला स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घटना आणि व्यक्तींची पुरेशी माहिती नाही. मीही याच पिढीचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे जेन झीने एक नागरिक म्हणून आणि देशाचे भविष्य घडवणारी पिढी म्हणून हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. आजच्या तरुणांना देशाबद्दल प्रेम नाही असे नाही. मात्र, ते व्यक्त करण्याची माध्यमे बदलली आहेत. सोशल मीडिया हे त्यांच्यासाठी प्रभावी व्यासपीठ आहे. तरुणाईने देशासाठी पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे.
आर्य झुझम : भारताला स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. अनेकांनी त्यासाठी त्याग केला. आज आपल्याकडे शिक्षण, तंत्रज्ञान आणि विविध संधी आहेत. या संधींचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी न करता समाजाच्या विकासासाठीही केला पाहिजे. संविधानाचा आदर करणे, भ्रष्टाचाराला विरोध करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील राहणे, हीदेखील नागरिकांची जबाबदारी आहे. त्यालाच खऱ्या अर्थाने देशप्रेम म्हणतात.
सई घुले : प्रत्येक तरुणाला स्वातंत्र्यलढ्याची सविस्तर माहिती असेलच असे नाही. मात्र, आपण ज्या देशाचे नागरिक आहोत आणि त्याचे भविष्य घडवण्यात आपली भूमिका आहे, याची जाणीव असली पाहिजे. विद्यार्थी आंदोलन किंवा सामाजिक प्रश्नांवर तरुणांनी आवाज उठविणे गरजेचे आहे; मात्र, कोणत्याही विषयावर भूमिका घेण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मी नोकरीनिमित्त अमेरिकेत असते. पण, आपल्या देशाविषयीचे प्रेम आणि ओढ ती तेवढीच आहे.
अक्षय जाधव : आमच्या पिढीची देशप्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. सरकारी योजना, धोरणे, राजकारण किंवा देशासमोरील प्रश्नांवर पोस्ट करणे सोपे आहे. पण त्या प्रश्नाचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्यावर उपाय शोधण्यासाठी पुढे येणे अधिक महत्त्वाचे आहे. छोट्या कृतींमधूनही देशाप्रति आपली जबाबदारी पार पाडता येते. देशभक्तीचा कंटेंट बनवण्यापेक्षा देशासाठी उपयोगी ठरेल असा कंटेंट आणि त्यापुढची प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे.