

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी (दि. 19) त्यांना निवडीचे पत्र दिले. तसेच, माजी नगरसेवक राहुल भोसले, शाम लांडे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, फजल शेख यांची शहर कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडी सुरू केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. शहरातील राष्ट्रवादीच्या बहुतांश सर्वच आजी-माजी नगरसेवकांनी अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी आज शहरातील प्रमुख पदाधिकार्यांच्या निवडी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केल्या.
या वेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, राहुल भोसले, शाम लांडे, प्रभाकर वाघेरे, प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मंगळवारी (दि.18) कारवाई करीत शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह या कार्याध्यक्षांना पक्षातून बडतर्फ केले होते.
पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासाची अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.