

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे पर्यटकांना 31 जुलैपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे. पावसाळी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
किल्ले शिवनेरीच्या गणेश दरवाजाच्या वरील बाजूस असलेला साधारण 7 ते 8 फूट लांब व 5 ते 6 फूट रुंदीचा खडक ढासळून किल्ल्याच्या भातखळा बाजूस खाली घसरून आला आहे. तसेच गणेश दरवाजाच्या लगत असलेली 8 ते 9 फूट लांबीची किल्ल्याची तटबंदी तुटली असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपासून जुन्नर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्या अनुषंगाने पावसाळ्यातील पर्यटनासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दि. 31 जुलैपर्यंत किल्ले शिवनेरी पर्यटनासाठी बंद करून पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
प्रतिबंधात्मक उपायययोजनांचे पालन न करणार्या पर्यटकांवर भारतीय वन अधिनियम 1927, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व तत्सम कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी वनविभागाला दिले आहेत.