

गडकुंदर : भारतात अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, जेथे जाण्यास लोक आताही कचरतात. अशा ठिकाणी जाणे म्हणजे आपल्या जीवनाशी खेळल्यासारखे! कारण इथे कधी काय होईल याचा काही नेम नाही, अशीच या ठिकाणांची वंदता झाली आहे. अशा बर्याच ठिकाणांची लोकांना माहिती असते; पण त्यामागचे नेमके कारण काय आहे, याची काहीच कल्पना नसते. अशाच काही रहस्यमय ठिकाणांमध्ये गडकुंदर या किल्ल्याचा आवर्जून समावेश होतो. कारण आजवरचा इतिहास हेच सांगतो की, येथे जाण्याचे धारिष्ट्य करणारी व्यक्ती परत कधीच येत नाही.
उत्तर प्रदेशातील झाशी येथे असलेला गडकुंदरचा किल्ला हा भूतबाधित आहे, असा दावा केला जातो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या किल्ल्याचा इतिहास लोकांना माहीत नाही. ऐतिहासिक पुस्तकांमध्येही या किल्ल्याची फारशी माहिती नाही. हा किल्ला 11 व्या शतकात बांधला गेला, असे म्हणतात. या किल्ल्यात एकूण 5 मजले आहेत. स्थानिक लोकांच्या मते, हा किल्ला 1500 ते 2000 वर्षे जुना आहे. या भागात चंदेल, बुंदेला आणि खंगारांनी राज्य केले आहे. याव्यतिरिक्त याबद्दल फारशी माहिती कोणाकडेच नाही. असे सांगितले जाते की, गडकुंदरचा किल्ला भूलभुलैयासारखा बांधला आहे. त्यात प्रवेश करणारा नेहमी गोंधळून जातो. आश्चर्याची बाब म्हणजे हा किल्ला चार ते पाच किलोमीटर अंतरावरून दिसतो; पण जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या जवळ जाते, तेव्हा हा किल्ला दिसत नाही.
येथे राहणारे लोक सांगतात की, एकदा या किल्ल्याजवळून एक मिरवणूक जात होती. सुमारे 50-60 लोक या गडावर गेले होते; पण त्यानंतर आजपर्यंत ते लोक परतले नाहीत. किल्ल्यासंदर्भात इतरही अशा घटनांचा उल्लेख आहे. या घटना पाहता, गडावरील खालचे मजले बंद करण्यात आले. दिवसाही तिथे जाणे हा एक भयानक अनुभव आहे. गडाच्या आत खूप अंधारदेखील दिसून येतो. या किल्ल्याबद्दल असेही सांगितले जाते की, येथे हिरे आणि सोन्याचा खजिना दडला आहे. अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला; पण ते अयशस्वी झाले. या किल्ल्याचे रहस्य मात्र अद्याप उलगडलेले नाही.