टाकळी हाजी परिसरात गॅस्ट्रो, तापाची साथ

टाकळी हाजी परिसरात गॅस्ट्रो, तापाची साथ

टाकळी हाजी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा पारा वाढल्यामुळे टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरात गॅस्ट्रो व तापाची साथ पसरली आहे, तर उष्माघाताच्या रुग्णांचीही उपचारांसाठी दवाखाने, रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. गेल्या महिन्यात तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा तापमान वाढत गेले. आता 40 अंश सेल्सिअसपर्यंत जात असून, यामुळे नागरिकांना दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

शेतकर्‍यांची शेतीची कामे मजुरांअभावी उरकली नसल्याने तळपत्या उन्हातही ते शेतात राबत आहेत. त्यामुळे अनेकांना उष्माघात झाला आहे. यापैकी अनेकांना उन्हाळी लागणे, पोट दुखणे, चक्कर येणे, ताप येणे, डोळ्यांना जळजळ होणे आदी विकारांनी ग्रासलेले आहे. याशिवाय लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकदेखील आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे गावात गॅस्ट्रो तसेच तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे परिसरातील दवाखाने, रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांची गर्दी वाढली आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी

उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी शेतकरी, मजुरांनी शेतात काम करणे टाळावे.
वेळोवेळी पाणी, लिंबू, सरबत याचे सेवन करावे. शक्यतो उष्ण आहार टाळावा. आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा, असे आवाहन डॉ. अरुण थोरात यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news