

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून गॅस काढून त्याची विक्री करणार्या टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.14) सकाळी पुनावळे येथे करण्यात आली. किशोरकुमार भाकरराम मेधवाल (22, रा. पुनावळे), रितेश सुरेश यादव (21, रा. पुनावळे), राजाराम लालाराम बिष्णोई (38, रा. पुनावळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिस शिपाई तानाजी कचरे यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडे गॅस रिफिलिंगचा कोणताही परवाना नसताना व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये चोरून गॅस काढला.
रिफिलिंग करत असताना स्वत:च्या व लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल अशी कृती केली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत तिघांनाअटक केली. त्यांच्याकडून सहा लाख आठ हजार 656 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. रावेत पोलिस तपास करीत आहेत.