मोकळ्या भूखंडावर टाकला जातोय कचरा

मोकळ्या भूखंडावर टाकला जातोय कचरा
Published on
Updated on

मोशी : पुढारी वृत्तसेवा : मोशी प्राधिकरणात, पुणे – नाशिक महामार्गालगत मोशी, आदर्शनगर परिसरात प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर रबर, प्लास्टिक व फायबर कचरा अवैधरीत्या टाकला जात असून, तो जागीच जाळला जात असल्याने त्यातून दुर्गंधीयुक्त धूर निघत आहे. या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार जाणवू लागले आहे. हा प्रकार अनेक महिन्यांपासून सर्रास सुरू असून, त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने या मार्गावरील प्रवाशी व परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
एमआयडीसीतील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये फायबर, रबर, प्लास्टिक वस्तू बनविताना त्यातून निघणारा वेस्टेज कचरा रात्रीच्या वेळी प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागे लगतच्या नाल्या ओढ्याभोवती महामार्गलगत भूखंडावर टाकला जात आहे.

तो पसरू नये, याकरिता त्याला पेटवून दिले जात असून, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. मोकळ्या भूखंडाचा खासगी कंपनीकडून कचरा टाकण्यासाठी वापर होत असल्याचे निदर्शनात येत आहे. अगोदरच मोशी गावच्या एका बाजूने पालिकेच्या कचरा डेपोची दुर्गंधी येथील स्थानिक रहिवाश्यांना असह्य होत असताना दुसर्‍या बाजूने मोकळ्या भूखंडावर कचरा जाळून दुर्गंधी पसरविल्याच्या प्रकाराची भर पडली. नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होत असून प्रशासनाच्या संबंधित विभागाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

दरम्यान महामार्गाला लागून दहा फुटांवरच असा कचरा पेटविला जात असल्याने वार्‍यामुळे आगीचा व वाहनाचा संपर्क आल्यास त्यातून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोणाची मिलीभगत..?
महामार्गालगत कचरा टाकून जाळण्याचे प्रकार गेल्या वर्षभरापासून बिनदिक्कत सुरू असून, त्यावर काहीच कारवाई होताना दिसून येत नसल्याने हा प्रकार कोणाच्या आश्रयाखाली सुरू आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले असून, यामागे अर्थपूर्ण मिलीभगत असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू असल्याचे समजते. दरम्यान, याच ठिकाणी अवघ्या पाचशे मीटरवर शहराचा कचरा डेपो असताना त्यात कचरा टाकण्यापेक्षा जाळण्याचा त्रास का व कशासाठी घेतला जात आहे, की यामागे काही वेगळं कारण आहे, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news