Baramati News: बारामती शहरात प्रवेशाच्या मार्गावर कचर्याचे मोठे ढीग साचले आहेत. त्यावर अनेक व्यावसायिक राडारोडा टाकत असल्याने या भागातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे स्वच्छतेत पुरस्कार मिळविलेल्या शहराच्या नावलौकिकाला धक्का लागत आहे. नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शहराच्या जवळून गेलेल्या रिंगरोडच्या कडेला कचर्याचे ढीग लागले आहेत. शहरात प्रवेश करताना बारामती शहराची स्मार्ट सिटी या प्रतिमेला त्यामुळे तडा जात आहे. पाटस रस्त्यावरील देशमुख चौक, फलटण रोडवरून प्रशासन भवनच्या बाजूला जाताना कर्हा नदीपात्रात चिकन, मच्छी, मटणचे व्यापारी कचरा टाकत आहेत. मोरगाव रस्त्यावरून येताना नाल्यात काही नागरिक कचरा व राडारोडा टाकत असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे.
शहरातून जाणार्या कर्हा नदीच्या पात्रामध्ये कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभीकरणाचे काम केले जात आहे. आगामी काळात वॉकिंग ट्रॅक केला जाणार आहे. मात्र, नदीपात्रात बाजारपेठेतील व्यापारी, हॉटेलचालक कचरा, राडाराडा रात्रीच्या वेळी टाकत आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करूनही नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
यामुळे मोरगाव रस्ता, माळेगाव रस्ता, इंदापूर रस्त्यावरून जाणार्या बायपासच्या कडेला कचर्याचे ढीग लागले आहेत. हा कचरा तातडीने उचलावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.