नगर : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी (दि. २५) जिल्ह्यात आमदार राम शिंदे व आमदार आशुतोष काळे यांच्यासह २१ जणांनी २७ उमेदवारी अर्ज दाखल केले. नेवासा व संगमनेर या दोन्ही मतदारसंघांत दिवसभरात एकही अर्ज दाखल झाला नाही.
दरम्यान, गेल्या चार दिवसांत ५३ उमेदवारांचे ६९ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, नेवासा मतदारसंघात अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा श्रीगणेशा झालेला नाही. शनिवारी आणि रविवारी सुटी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस उरले आहेत. गेल्या चार दिवसांत नेवासा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अद्याप कोणीच फिरकले नाही.
संगमनेर मतदारसंघात आतापर्यंत एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार राम शिंदे यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या पत्नी आशाबाई शिंदे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्वप्नील देसाई, बहुजन क्रांती पक्षाच्या वतीने शहाजी विश्वनाथ उबाळे व शिवाजी नरहरी कोकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कोपरगाव मतदारसंघातून आमदार आशुतोष अशोकराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. याशिवाय शिवाजी पोपटराव कवडे यांनीदेखील अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
राहुरी मतदारसंघातून ज्ञानेश्वर मेहेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिर्डी मतदारसंघातून मयूर संजय मुर्तडक व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी अर्ज भरले आहेत. श्रीगोंदा मतदारसंघातून सागर कासार, अजित भोसले व आणखी एक अशा तीन जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
अकोले मतदारसंघातून एकाने अर्ज दाखल केला आहे. शेवगाव मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने किसन जगन्नाथ चव्हाण यांच्यासह तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. श्रीरामपूर मतदारसंघातून एकाने उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे.
मात्र, शनिवारी व रविवारी या दोन दिवशी सलग सुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे सोमवारी व मंगळवारी या दोन दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या दोन्ही दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर शहर मतदारसंघासाठी दिवसभरात फक्त २ अर्ज प्राप्त झाले आहेत. सुनील सुरेश फुलसौंदर व उत्कर्ष राजेंद्र गिते या दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.
आतापर्यंत या मतदारसंघात आमदार संग्राम जगताप यांच्यासह तीन जणांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गेल्या चार दिवसांत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, मोनिका राजळे, संग्राम जगताप, आशुतोष काळे व डॉ. किरण लहामटे; माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर घुले व राहुल जगताप, अॅड. प्रताप ढाकणे, हर्षदा काकडे, प्रभावती ढाकणे, राणी लंके, डॉ. राजेंद्र पिपाडा, ममता पिपाडा आदींसह ५३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.