सुवर्णा चव्हाण
पुणे : दोडिया, तीन ताली, हिंच असे गरब्यातील विविध पारंपरिक प्रकार असो वा आजच्या काळातील तरुणाईसाठीचे साल्सा गरबा, सुरती स्टाईल, वेस्टर्न गरबा, फायर गरबा अन् बॉलिवूड गरबा... असे वैविध्यपूर्ण गरब्याचे प्रकार... सध्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून, गरब्याचे विविध प्रकार शिकण्याकडे तरुणाईचा कल आहे. (Pune Latest News)
खासकरून साल्सा, बॉलिवूड, वेस्टर्न गरबा शिकण्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून, तरुणांसह ज्येष्ठ नागरिक दांडिया-गरब्याचे प्रशिक्षण घेताना दिसत आहेत. नृत्यदिग्दर्शकांच्या प्रशिक्षण वर्गात तरुण-तरुणींसह महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही उत्साहात सहभागी होत आहेत. विविध स्पर्धा, दांडिया-गरब्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या पूर्वतयारीसाठी दांडिया-गरब्याचे प्रशिक्षण घेतले जात आहे.
नवरात्रोत्सवात दांडिया-गरब्याचे मोठे कार्यक्रम असतात. ठिकठिकाणी आयोजिलेल्या कार्यक्रमांमध्ये, महोत्सवांमध्ये आणि स्पर्धांमध्ये पारंपरिक वेशभूषेत तरुण-तरुणींसह ज्येष्ठ महिलांचाही सहभाग असतो.
शारदीय नवरात्रोत्सवाला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे पारंपरिक वेशभूषेत गाण्यांवर दांडिया- गरबा करीत थिरकायला सर्व वयोगटातील लोक सज्ज आहेत. त्यामुळेच नृत्यदिग्दर्शकांमार्फत चालविल्या जाणार्या दांडिया-गरब्याच्या वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे वर्ग सुरू असून, एका वर्गात 100 ते 200 जणांचा सहभाग आहे. फक्त गुजरातीच नव्हे, तर महाराष्ट्रीय अन् विविध राज्यांतील लोक दांडिया-गरब्याचे प्रशिक्षण घेत आहेत.
याविषयी नृत्यदिग्दर्शिका रंजू ओसवाल म्हणाल्या, दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काही दिवसाआधी प्रशिक्षण वर्गांना सुरुवात होते. मोठ्या उत्साहात सगळे नृत्याची पूर्वतयारी करतात. गेल्या काही महिन्यांपूर्वीच आम्ही दांडिया-गरब्याच्या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात केली आहे. दांडिया- गरब्याच्या पारंपरिक प्रकारांसह तरुणाईसाठी साल्सा गरबा, सुरती स्टाईल, वेस्टर्न गरबा, फायर गरबा
असे नवे प्रकारही आम्ही शिकवत आहोत. तरुणांसह महिला-युवतींचा सर्वाधिक प्रतिसाद आहे. सुमारे 200 जणांना आम्ही प्रशिक्षण देत आहोत.