

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आलेल्या हरकती सूचनांवर उद्या, गुरुवारपासून दोन दिवस सुनावणी घेतली जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्हि राधा यांच्यासमोर नागरिकांकडून आलेल्या हरकती सूचनांवर सुनावणी होईल. या सुनावणीत तब्बल 5 हजार 990 हरकतींवर चर्चा होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या असताना केवळ दोन दिवसांचा वेळ सुनावणीसाठी देण्यात आल्याने अनेक हरकतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (Pune Latest News)
प्रभागरचनेच्या अखेरच्या दिवशी तब्बल 2899 हरकती दाखल झाल्या. त्यामुळे या वेळी एकूण हरकतींचा आकडा मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट झाला आहे. त्यात प्रभाग क्र. 34 नर्हे-वडगाव बुद्रुकमधून सर्वाधिक 2 हजार 66 हरकती आल्या आहेत. प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक 29 यांची सुनावणी 11 सप्टेंबरला तर प्रभाग क्रमांक 30 ते 41 या प्रभागांवरील हरकती आणि सूचनांची सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे. या सुनावणीसाठी ज्या नागरिकांनी हरकती आणि सूचना नोंदविल्या आहेत. त्यांना प्रत्यक्ष तेथे उपस्थित रहावे लागणार आहे. नागरिकांनी सुनावणीसाठी कधी उपस्थित रहायचे याचे प्रभागनिहाय वेळापत्रक महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. तसेच प्रत्येक हरकत नोंदविणार्याला पत्रदेखील महापालिकेने पाठवले आहे.
22 ऑगस्टला जाहीर झालेल्या प्रारूपरचनेवर 4 सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत होती. रचनेत राजकीय हस्तक्षेप करून प्रभागांची मोडतोड केल्याचे आरोप होत आहेत. भाजप वगळता इतर सर्व प्रमुख पक्षांनी यावर अभ्यास करून मोठ्या संख्येने हरकती नोंदवल्या आहेत. बहुतांश आक्षेप हे प्रभागांच्या सीमांबाबत असून, यामुळे सुनावणीदरम्यान गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात प्रवेशासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. फक्त हरकतदारांनाच आत प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी ओळखपत्र, महापालिकेकडून आलेला मेसेज किंवा पाठविलेले पत्र दाखवणे आवश्यक आहे. बाहेरील कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असून, सभागृहाच्या आत आणि बाहेरील कार्यवाहीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या 165 असून, 41 प्रभाग आहेत. त्यापैकी 40 प्रभाग चारसदस्यीय, तर 38 क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाचसदस्यीय आहे. पालिकेमध्ये 34 गावांचा समावेश करण्यात आला होता; पण उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे राज्य सरकारने वगळली आहेत. त्यामुळे नव्याने प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यामुळे माजी नगरसेवकासह इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गटाला प्रभागरचना अनुकूल झाल्याचा आरोप केला जात आहे.
1) 11 सप्टेंबर 2025 (गुरुवार)
प्रभाग 1 ते 6 - सकाळी 10 ते सकाळी 11.30 वा.
प्रभाग 7 ते 14 - सकाळी 11 ते सकाळी 1.30 वा.
प्रभाग 15 ते 21- दुपारी 2.30 ते सायं. 4 वा.
प्रभाग 22 ते 29 - सायं. 4 ते सायं. 6 वा.
2) 12 सप्टेंबर 2025 (शुक्रवार)
प्रभाग 30 ते 34- सकाळी 10 ते सकाळी 11.30 वा.
प्रभाग 35 ते 37 - सकाळी 11 ते सकाळी 1 वा.
प्रभाग 38 ते 41- दुपारी 2.30 ते सायं. 4 वा.
सामाईक हरकती राखीव- सायं. 4 ते सायं 5 वा.