पुणे: पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची जल्लोषात सुरुवात झाली आहे. गुरुवारी दीड दिवसाच्या गणपतीला पुणेकर निरोप देणार असून, यासाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. महापालिकेने यंदा लोखंडी टाक्यांची संख्या वाढवली असून, 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 38 ठिकाणी कायमस्वरूपी हौद बांधण्यात आले आहेत. 281 ठिकाणी 648 लोखंडी टाक्या, तर नदीकाठावर 328 निर्माल्यसंकलन कंटेनर ठेवण्यात आले आहे.
पुण्यातील वैभवी गणेशोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. विविध मंडळांनी आकर्षक व प्रबोधनात्मक देखावे तयार केले असून, पहिल्या दिवसापासून हे देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी मध्यवस्तीत गर्दी केली होती. गुरुवारी (दि. 28) दीड दिवसाच्या गणरायाला पुणेकर निरोप देणार आहेत. यासाठी महापालिकेने विसर्जनाची तयारी केली आहे. (Latest Pune News)
निर्माल्यसंकलनासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. शाडू मातीच्या पुनर्वापरासाठी 46 ठिकाणी शाडू मातीची संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत. तर 241 ठिकाणी मूर्तिदान केंद्र उभारली आहेत. यामुळे नदीप्रदूषण टाळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता दिलेल्या कंटेनरमध्ये जमा करावे, असे प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सव 2024 मध्ये प्रतिदिन 386 फिरती शौचालये पुरविण्यात आली होती. यावर्षी एकूण 554 फिरत्या शौचालयांची मागणी क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली असून, त्यानुसार पुरवठा केला आहे.