पुणे : गंगाधाम चौपाटी ठरतेय डोकेदुखी
बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी येथील उच्चभ्रू अशा गंगाधाम सोसायटीच्या परिसरात वाढलेली अतिक्रमणे, रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेली अनियंत्रित वाहने, यामुळे या परिसरातील विविध सोसायट्यांतील नागरिकांना दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
गंगाधाम सोसायटीदरम्यान गगन गॅलेक्सी, गगनविहार, गंगाधाम फेज 1, फेज 2 तसेच वर्धमानपुरम व बैठे बंगले इत्यादी ठिकाणच्या रहिवाशांनी करोडो रुपये खर्चून सदनिका विकत घेतल्या असून, या परिसराचा दिवसेंदिवस विकास झाल्यामुळे समस्यांतही तेवढीच भर पडली आहे.
मेघदूत हॉटेल ते गंगाधाम फेज 2 च्या दरम्यान दररोज सायंकाळी गाड्या अस्ताव्यस्त पार्क केल्या जातात, तर गगन गॅलेक्सीच्या प्रवेशद्वारादरम्यान असलेल्या दुकानदारांनी फुटपाथवर पोटभाडेकरू ठेवल्यामुळे नव्याने चौपाटी निर्माण झाली आहे. या अनधिकृत चौपाटीमुळे रात्री बारापर्यंत तरुणांचा धिंगाणा असतो. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. या अनधिकृत चौपाटीमुळे पार्किंग रस्त्यावर आले आहे. याबाबत पोलिस व महापालिकेचे अतिक्रमण खाते सोईस्कररीत्या दुर्लक्ष करताना दिसते.
गंगाधाम चौपाटी ही अनधिकृत आहे. दुकानदारांनी दुकानासमोर स्टॉल, हातगाड्या व इतर व्यावसायिकांना जागा भाड्याने देऊन पार्किंगच्या
जागेत आपली दुकाने थाटली आहेत. मनपाकडे तक्रार देऊनही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.
– जतीन नहार, स्थानिक रहिवासीगंगाधाम चौपाटी येथील पार्किंगच्या जागेत उभारण्यात आलेल्या स्टॉलवर यापूर्वी अतिक्रमणनिर्मूलन विभागाने कारवाई केली आहे. यापुढेही कारवाई केली जाणार आहे. पार्किंगबाबत वाहतूक पोलिस या ठिकाणचा निर्णय घेतील.
– महेश मारणे, अतिक्रमण निरीक्षक, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, पुणे महापालिका