पुण्यात टोळक्याचा राडा; 19 वाहनांची तोडफोड

पुण्यात टोळक्याचा राडा; 19 वाहनांची तोडफोड

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दोन गटातील वर्चस्ववादातून दहशत निर्माण करण्यासाठी पीएमसी कॉलनी पांडवनगर येथे 25 ते 30 जणांच्या टोळक्याने चौदा दुचाकी, चार चारचाकी व एक रिक्षा अशा 19 वाहनांची तोडफोड केली. या वेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. सोनू सुनील अवघडे (वय 25) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी रुपेश विटकर (वय 25), इस्माईल शेख (वय 20) या दोघांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अवघडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या इतर साथीदारांच्या विरुद्ध आर्म अ‍ॅक्टसह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विटकर आणि फिर्यादी हे एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. 17 एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास विटकर हा त्याच्या साथीदारांसोबत पीएमसी कॉलनी पांडवनगर येथे आला. त्यांनी शिवीगाळ करत वाहनांची तोडफोड केली. त्या वेळी अवघडे हे तेथे होते. विटकर हा त्याच्या एका साथीदारासोबत त्यांच्याजवळ आला आणि अवघडेच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तो चुकविल्यामुळे त्यांच्या खांद्यावर जखम झाली. यानंतर टोळक्याने तोडफोड करत दहशत निर्माण केली. फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

सय्यदनगरमध्ये टोळक्याचा राडा, तरुणावर वार
जुन्या वादातून टोळक्याने तरुणावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांवर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 16 एप्रिलला रात्री हडपसर येथील सय्यदनगर परिसरात घडली.शाबाब सैय्यद (वय 19, रा. हडपसर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अल्ताफ, शाहरूख, रेहान आणि आझीम नावाच्या चौघांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव तपास करीत आहेत.

टोळीच्या वर्चस्ववादातून खुनाचा प्रयत्न

टोळीच्या वर्चस्वावरून अण्णा डोळसे कुठे आहे? अशी विचारणा करून एकावर तलावर व धारदार हत्यारांनी वार करून खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गौरव संजय शेळके (21, रा. वादळ चौक, वारजे), अभिषेक नवनाथ सकट (19, रा. रामनगर, वारजे) आणि सचिन शंकर दळवी (23, रा. दांगट पाटीलनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्याच्यासह ओंकार, रोहन, साहिल आणि अमिश नावाच्या इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चेतन मारुती शेडगे (24, रा. जय भवानीनगर, रामनगर वारजे) याने फिर्याद दिली आहे.

16 एप्रिल रोजी आंबेडकर जंयतीचा कार्यक्रम उरकून वारजे गावठाणमधून रामनगरकडे येणार्‍या रस्त्याकडे फिर्यादी व कृष्णा शिंगाडे हा चालत रामनगर येथील प्रवण सुपर मार्केटजवळ बसले. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी आण्णा डोळसे कुठे आहे ? अशी विचारणा केली. त्यावर चेतन शेडगेने मला माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी यालाच टाकरे म्हणत चेतनवर तलवारीने वार केले. ते वार चेतनने हातावर घेतले. त्यानंतर आरोपींनी चेतनच्या शरीरावर वार केले. दरम्यान गोंधळ दिसताच लोकही जमा झाल्यानंतर आरोपी पळून गेले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सचिन दळवी आणि चेतन यांची लहानपणापासून ओळख आहे. चेतन हा भिमशक्ती चौकातील नितीन गायकवाड याच्यासोबत असल्याने 2016 मध्ये निलेश गायकवाड याच टोळीतील त्याचा साथीदार निलेश मिसाळ याच्या खुनाच्या गुन्ह्यात नितीन गायकवाड व इतरांबरोबर चेतनलाही अटक झाली होती. ती केस नंतर सुटली. सचिन गायवाड हा निलेश गायकवाड टोळीतील असून तो मोक्कात जामीनवर आहे. अण्णा डोळसे हा भिमशक्ती चौकातील असून तो नितीन गायकवाड याच्या टोळीतील आहे. त्याची व अण्णा डोळसे याची 16 एप्रिलला दुपारी निलेश गायकवाड याच्या टोळीतील कार्तिक इंगवले व इतर लोकांवरील गोळबाराची केस मागे घेण्यसाठी शिवीगाळ व भांडण झाल्याचे समजले. त्यामुळे त्याला मारण्यासाठी सचिन दळवीसह त्याचे साथीदार तेथे आले होते. चेतनदेखील नितीन गायकवाड टोळीतील असल्यने व निलेश मिसाळ याच्या खुनामध्ये देखील नाव असल्याने हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news