पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असताना नातेवाइकांचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून रुग्णालयात गोंधळ घालत वैद्यकीय अधिकार्यांच्या अंगावर धावून जाणार्यांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 नोव्हेंबरच्या रात्री साडेबाराला घडला. याप्रकरणी भुपेंद्र मुरले (40, नवले बि—जजवळ, नर्हे), शुभम प्रफुल्ल घरवटकर (20, रा. धायरी) आणि दिलीप चाचुर्टे (रा. बुधवार पेठ) यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉ. मयूर सत्यवान सातपुते (30, रा. भिंताडेनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ससून रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी आहेत.
26 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री आठ ते 27 नोव्हेंबर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते वॉर्ड क्रमांक 74 येथे आरएमओ (निवासी वैद्यकीय अधिकारी) म्हणून काम करीत होते. त्यांच्याबरोबर डॉ. श्रीहरी हळनूर हे देखील कामावर होते. दोघेही वॉर्ड क्रमांक 40 येथे रुग्णाची तपासणी करीत असताना रविवारी रात्री साडेबारा वाजता कामास असलेल्या गार्डने त्यांना येऊन सांगितले की, एमआयसीयू वॉर्डसमोर सहा व्यक्ती मोठ्याने आरडाओरडा करून डॉ. विक्रम यांच्याशी वाद घालत आहेत. त्या वेळी फिर्यादी यांनी डॉ. विक्रम यांच्याशी चर्चा केली असता त्या वेळी एका रुग्णावर मेंदूसंदर्भात उपचार सुरू होते. त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या कारणातून डॉक्टरांनी उपचार व्यवस्थित न केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याबाबत आरडाओरड सुरू केली. या वेळी डॉक्टरांनी पोस्टमार्टम करण्याबाबत सांगितले असता त्या वेळी रुग्णाच्या दोन्ही मुलांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. तसेच बॉडी ताब्यात द्या म्हणत ते फिर्यादी डॉ. सातपुते आणि डॉ. हळनूर यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले.