

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहर परिसरात वाहनचोरी आणि बंद दुकानांचे शटर उचकटून चोरी करणार्या चौघा जणांच्या टोळीला चंदननगर पोलिसांच्या पथकाने अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चंदननगर, लोणीकंद, विमानतळ, समर्थ पोलिस ठाण्याकडील घरफोडी व वाहनचोरीचे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहेत.
गणेश दगडू शिंदे (पिंपरी-चिंचवड), यश सर्जेराव खवळे (19, रा. पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे. तर, दोघा अल्पवयीनांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. चंदननगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर असताना एका वाहनामध्ये चार ते पाच जण संशयीतरीत्या चंदननगर भागात फिरत असल्याची माहिती कर्मचारी सुभाष आव्हाड, नामदेव गडदरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संघर्षनगर भागातून आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. मात्र, पोलिसांच्या पथकाने दोघा अल्पवयीनांसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शहरातील विविध भागांत वाहनचोरी, घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून विविध पोलीस ठाण्यांतील एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील गणेश शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत.