

पुणे: महाराष्ट्रातील सर्वाधिक भव्य आणि लोकभावनेने भरलेला गणेशोत्सव आता अधिकृतपणे ‘राज्य उत्सव’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, गणेशोत्सवाला मिळालेल्या या मान्यतेमुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या या उत्सवाला आता शासनाची अधिकृत मदत मिळणार आहे.
या निर्णयानंतर राज्य शासनाकडून खास निधीची तरतूद करण्यात येणार आहे. हा निधी प्रामुख्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि पर्यटन विकासासाठी वापरण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागात गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळांना आर्थिक मदत मिळेल, जेणेकरून स्थानिक कला, परंपरा आणि लोकसांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळेल. (Latest Pune News)
राज्य सरकारचा हेतू केवळ उत्सव साजरा करणे हा नसून, गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा जपणे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे आणि पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा मुख्य उद्देश आहे.
याशिवाय या निधीतून सुरक्षितता, स्वच्छता, सजावट, लायटिंग, सार्वजनिक शौचालये, पर्यावरणपूरक मूर्ती प्रोत्साहन यांसारख्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जाहीर केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण न राहता राज्याचा गौरवशाली आणि पर्यटनप्रवर्धक उत्सव ठरणार आहे.