पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी होण्यावरून निर्माण झालेला प्रश्न सर्वसंमतीने सोडवू. मानाचे गणपती किंवा अन्य मंडळांमध्ये अजिबात मतभेद नाहीत. विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने तोडगा काढण्यासाठी सर्व मंडळांच्या पदाधिकार्यांची लवकरच एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असा निर्णय मानाच्या मंडळाच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी (दि. 5) जाहीर केला. (Pune latest News)
दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्यांची बैठक पार पाडली. या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीणसिंह परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नितीन पंडित, विकास पवार, केसरी गणेशोत्सव ट्रस्टचे अनिल सपकाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनित बालन, हुतात्मा बाबू गेन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रमुख मंडळांचे पदाधिकारी श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, संजय बालगुडे, श्रीकांत भिसे, पुष्कर तुळजापूरकर, सुनील कुंजीर, विशाल गुंड, आनंद सगरे या वेळी उपस्थित होते.
यंदा विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळाने मानाची मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर बेलबाग चौकमार्गे मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर विविध मंडळांच्या पदाधिकार्यांनी विसर्जन मिरवणुकीतील सहभागी होण्यावरून भूमिका जाहीर केली. गणेशोत्सवातील नियोजन, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या पोलिस आयुक्तालयात दोन बैठकांचे आयोजन करण्यात आले.
पहिल्या बैठकीत विविध मंडळांच्या पदाधिकार्यांनी आक्षेप नोंदविला. मानाच्या पाच मंडळांना आणि अन्य मंडळांना पोलिसांकडून वेगळा न्याय दिला जातो. वेळेत मिरवणूक आटोपण्यासाठी पोलिसांनी मिरवणुकीमध्ये ’एक मंडळ एक ढोल पथक’ हा नियम लागू करावा. मानाच्या मंडळांसाठी पोलिसांनी केळकर, कुमठेकर, तसेच टिळक रस्त्यावरील मंडळांची अडवणूक करू नये. विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ सकाळी सात वाजता करण्यास परवानगी द्यावी, तसेच लक्ष्मी रस्त्यावर आणखी मंडळांना परवानगी देऊ नये, गणेशोत्सवात बेलबाग चौक ते नाना पेठ हा रस्ता बंद न करता सुरू ठेवावा, अशी मागणी मंडळांच्या पदाधिकार्यांनी या बैठकीत केली.
मानाच्या गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्यापाठोपाठ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळाचा गणपती मिरवणुकीला मार्गस्थ होईल, असे अण्णा थोरात आणि पुनित बालन यांनी स्पष्ट केले. पुनित बालन म्हणाले, येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व मंडळे एकत्रित बैठक घेतील आणि चर्चेतून मार्ग निघेल. मात्र, हे निश्चित आहे की, मानाच्या पाचव्या गणपतीपाठोपाठ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळ मिरवणुकीत सहभागी होईल. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. यासाठी सर्व मंडळांशी चर्चा करून मार्ग काढू. दरम्यान, श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाकडून यंदा विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांची संख्या तीन ऐवजी दोनच असेल, असे पुनित बालन यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव मंडळांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. विसर्जन मिरवणुकीबाबत विचारविनमय करण्यासाठी सर्व प्रमुख मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक येत्या दोन दिवसांत आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर मिरवणुकीबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य देणे ही मंडळांची प्रमुख भूमिका आहे, असे श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले.
मंडळांच्या पदाधिकार्यांच्या दोन बैठका झाल्या. बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मिरवणुकीतील क्रमांकाबाबत पोलिस स्वतःहून कोणताही निर्णय घेणार नाहीत. जी परंपरा, प्रथा आहे, ती अबाधित राहावी. पोलिसांच्या दृष्टीने सर्व मंडळे सारखीच आहेत. त्यामुळे सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन विसर्जन मिरवणुकीबाबत निर्णय घ्यावा. त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा एकत्रित बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे