

मंचर: महाराष्ट्रासह जगभरात विविध ठिकाणी साजरा केला जाणारा सार्वजनिक गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली. यामुळे गणेशोत्सव मंडळांत आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे असले तरी गणेशोत्सव राज्य महोत्सव झाल्याने शासनाकडून गणेश मंडळांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
निरगुडसर येथील स्वराज मित्रमंडळाचे अध्यक्ष आदित्य थोरात म्हणाले की, राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव 1893 मध्ये प्रथम लोकमान्य टिळकांनी सुरू केला. सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, भाषा या सगळ्यांशी संबंधित उत्सवाची पार्श्वभूमी होती. समाजातील सर्व घटकांतील लोकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा, हा प्रमुख उद्देश यामागे होता. (Latest Pune News)
आता या उत्सवाला राज्य महोत्सवाची घोषित केल्याने उत्सवाची व्याप्ती वाढणार आहे. उत्सवानिमित्त ग्रामीण भागातील मंडळांमध्ये नवचैतन्य येणार असून, मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील. गावागावांत विविध समाज प्रबोधनावर देखावे साजरे केले जातील. मात्र, हे सर्व करीत असताना शासनाकडून गणेश मंडळांना आर्थिक सहकार्य अनुदानरूपी होणे देखील गरजेचे आहे.
मंचर येथील विठ्ठल नवरत्न गणेश मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल बाबा बेंडे म्हणाले, राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. जगातील 170 हून अधिक देशांत गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव आता राज्य महोत्सव घोषित झाल्याने गणेशोत्सवाची व्याप्ती वाढणार आहे.
हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाची ओळख आता जगभरात होणार आहे. गणेशोत्सव राज्य महोत्सव झाल्याने सरकार या महोत्सवाकडे विशेष लक्ष देणार असून, श्री गणेशोत्सवाच्या काळात होणारे जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
मंचर मार्केट यार्ड गणेश मंडळाचे अध्यक्ष संजय मोरे म्हणाले, ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. हा उत्सव आता राज्य महोत्सव झाला असून, ही बाब आनंदाची असली तरी ग्रामीण भागातील गणेश मंडळांना शासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात पैशांअभावी अनेक गणेश मंडळे बंद पडली आहेत. गणेशोत्सव काळात ग्रामीण भागात गणेश मंडळांना विविध कार्यक्रम घेण्यासाठी वेळेत परवानगी देणे, विविध कार्यक्रम, देखावे साजरे करण्यासाठी, सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी शासकीय निधी देऊन गणेशोत्सव मंडळांना बळ देणे गरजेचे आहे.
दौंडमधील विविध मंडळांकडून स्वागत
राज्य सरकारने गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे दौंडमधील विविध गणेश मंडळांकडून स्वागत करण्यात आले.शहरातील एकता गणेशोत्सव मंडळ हे सन 1975 पासून शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. आकर्षक विद्युत रोषणाईने या मंदिरावर भव्य अशी रोषणाई असते. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदू पवार म्हणाले, राज्य सरकारचा हा निर्णय स्वागताहार्य आहे.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला सरकारने उशिरा का होईना परंतु राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याने राज्य सरकारचे अभिनंदन. पाटील चौक येथील नूतन तरुण मंडळ हे सन 1962 पासून कार्यरत आहे. या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष इंद्रजीत जगदाळे यांनी सर्वप्रथम राज्य सरकारचे अभिनंदन करून, त्यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. हे मंडळ मागील 63 वर्षांपेक्षा जुने असून पारंपरिक देखावे दरवर्षी सादर करते.
विशेषतः या मंडळात जे देखावे सादर केले जातात, त्यामध्ये असणार्या मूर्ती या इचलकरंजीवरून आम्ही आणायचो. परंतु आता या मूर्ती अहिल्यानगरमधून आणत आहोत. अनेक गणेश मंडळे ही आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहेत.
बहुतांशी मंडळी वर्गणी गोळा करत नाही. पूर्वी सार्वजनिक मंडळ असल्यामुळे वर्गणी गोळा व्हायची, परंतु आता हळूहळू वर्गणी गोळा करण्याची प्रथा ही लुप्त होत चालली आहे. काही ठराविक कार्यकर्तेच (गणेश भक्त) स्वखर्चानेच हा उत्सव साजरा करीत असून त्यांना शासनाने अनुदान देण्याची मागणी देखील हे कार्यकर्ते करीत आहेत.