

पुणे : राज्यात पुढील काही दिवसांत 1 हजार 100 सेवा डिजिटली देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या सेवा-योजनांसाठी कुठल्याही व्यक्तीला शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडणार नाही. या सेवा घरी बसून मिळणार आहेत. 44 योजना आणि सेवांकरिता 90 टक्के नागरिक तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. या सेवा ऑनलाइन देण्याचे उद्दिष्ट असून, महसूल विभाग सुधारल्यास राज्य सुधाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Pune Latest News)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवापंधरवड्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यानंतर ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, योगेश कदम, खासदार मेधा कुलकर्णी, शहर आणि जिल्ह्यातील अनेक आमदार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, सेवा देताना सामान्यांचे जीवन सुलभ होईल, यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. सामान्यांच्या जीवनात सुलभता आणायची असल्यास नवीन महसुली प्रकरणे तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच लोकअदालतीच्या माध्यमातून जुन्या महसुली प्रकरणांना निकाली काढून सामान्यांना न्याय द्यावा लागणार आहे.
पाणंद रस्त्यांची लोकचळवळ व्हावी, शेतकर्यांच्या जीवनात पाणंद रस्त्यांचे महत्त्व मोठे आहे. या अतिक्रमणावरून होणारे वाद टाळण्यासाठी हे रस्ते जीआयएस नकाशांवर आणले जाणार आहेत. यातून गावागावांमधील अर्थकारण परिवर्तित होईल, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. पाणंद रस्त्याच्या कामासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेतल्याचे सांगत जलयुक्त शिवार योजनेत ज्या पद्धतीने कामे झाली, त्याची लोकचळवळ झाली, अशीच चळवळ या माध्यमातूनही होईल, अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. सोलापूरमधील कुर्डू येथील अवैध उत्खननावरून महिला पोलिस अधिकार्यासोबत झालेल्या वादावरही अजित पवार यांनी मिश्किल भाष्य केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रस्त्यांसाठी मुरूम टाकल्यास रॉयल्टी लागणार नाही तसेच पोलिसांचा बंदोबस्तही मोफत असेल, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पाणंद रस्त्यावर मुरूम टाकणे टाकण्यासाठी परवानगी आहे, याची नोंद घ्यावी. सर्व ही बाब तिकडे सोलापुरातही सांगावे, असा मिश्किल टोला लगावत बावनकुळे यांनी ही योजना एक महिन्यापूर्वी आणली असती, तर या बाबीचा गवगवा झाला नसता, असा खुलासाही केला.
पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी गावात पाणंद रस्त्यांच्या झालेल्या कामाबाबत कौतुक करीत अधिकार्याने ठरविल्यास सामान्यांचा त्रास कमी कसा करता येईल, याचे हे आदर्श उदाहरण असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील अधिकार्यांना आपल्या गावात असे काम करण्यासाठी या गावचा आदर्श घ्यावा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.