पुणे : ‘आरटीओ’ला जखमी करून पळालेला गजाआड

पुणे : ‘आरटीओ’ला जखमी करून पळालेला गजाआड
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रॅपिडो अ‍ॅपव्दारे बेकायदा प्रवासी वाहतूक करताना अडविल्यानंतर आरटीओशी बाचाबाची करून त्यांना जखमी करून पसार झालेल्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. मागील दोन महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.
पिंटू पूर्णचंद्र घोष (रा. खडकवासला) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरात बाईक टॅक्सी सेवेला बंदी आहे. घोष हा बाईक टॅक्सी घेऊन जात असताना विश्रांतवाडी येथे त्याला आरटीओ पथकाने अडविले. कारवाईनंतर महिला अधिकारी त्याच्या गाडीवर पाठीमागे बसून त्याला आरटीओ कार्यालयात घेऊन जात होत्या.

मात्र, घोष याने सहायक मोटर वाहन निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांशी झटापट करून त्यांना जखमी केले. यानंतर तो पसार झाला. आरोपींचा शोध घेत असताना तो खडकवासला भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. मात्र, आरोपी सापडत नव्हता. अखेर खडकवासला येथील गॅस एजन्सीमध्ये आरोपीच्या नावाचा शोध घेत त्याचा माग काढला. त्यावरून दोन महिन्यांपासून फरारी असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराडे, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

कारची परस्पर विक्री
कारची परस्पर विक्री करून पैसे व कार परत न करता लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन हरी वाटवे (रा. नाटी, सिंहगड रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत प्रकाश गोविंद पिंगळे (39, रा. विनायक नगर, पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रकाश पिंगळे हे आकाश पाठक यांच्याकडे पर्सनल सिक्युरिटी अधिकारी म्हणून नोकरीस आहेत.

पाठक यांना 35 लाखांची गरज असल्याने त्यांनी त्यांच्या पार्कींगमधील बीएमडब्ल्यू कारची विक्री करून पैशाची व्यवस्था होते का ? पाहण्यास पिंगळे यांना सांगितले होते. वाटवे हा कार खरेदी करण्यास तयार असल्याने त्याच्याकडून पाच लाख टोकन रक्कम घेऊन पिंगळे यांनी पाठक यांची कार त्याला दिली होती. दरम्यान, व्यवहारातील उर्वरित पैसे मिळावे यासाठी पिंगळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता, कार आज देतो, उद्या देतो म्हणत वाटवे यांनी ती कार विकली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायकल चोरणार्‍यास अटक
महागडी सायकल आणि मोबाईल चोरी करणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सायकल आणि दोन मोबाईल असा 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अभिषेक मलप्पा हावलेकर (वय 20, रा. आगम पार्क, सच्चाईमाता, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ आणि उपनिरीक्षक धीरज गुप्ता हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

त्या वेळी सच्चाईमाता, कात्रज परिसरात महागडी सायकल चोरणारा थांबल्याची माहिती पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अभिषेकला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सायकल आणि दोन मोबाईल जप्त केले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, हर्षल शिंदे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

माजी पोलिस निरीक्षकास अटकपूर्व जामीन मंजूर
प्रशासकांच्या परवानगीशिवाय संस्थेतील महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याप्रकरणात माजी पोलिस निरीक्षक रफी खान यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी हा आदेश दिला. त्याने अ‍ॅड. इब—ाहिम अब्दुल शेख व अश्रफ अली शेख यांच्या वतीने न्यायालयात अर्ज केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये खान कोणतेही कागदपत्रे घेऊन जाताना दिसत नाही. तपासी अधिकार्‍यांनी बराच तपास पूर्ण केल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. तो मान्य करीत न्यायालयाने जामीन मंजूर केला.

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
तडीपार केले असताना शहरात हत्यारासह फिरणार्‍या एकाला मुंढवा पोलिसांनी मगरपट्टा येथे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या पुलाखालून अटक केली. त्याच्या विरोधात एप्रिल महिन्यात तडीपारीचा आदेश काढण्यात आला होता. सागर शंकर घोडके (22, रा. बाग, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजित लकडे, गुन्हे निरीक्षक प्रदिप काकडे, सहायक निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून बदनामी करून समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, तसेच विविध कार्यकर्त्यांना फोन वरून जिवे मारण्याची धमकी देणार्‍या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश गायकवाड (रा. पनवेल, रायगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 नोव्हेंबर रोजी घडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news