

पुणे: आयुष कोमकरचा खून केल्याप्रकरणी अटक केलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे यांच्या पोलिस कोठडीत विशेष मकोका न्यायालयाने 22 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या रडारवर प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड टोळीतील सदस्यही असल्याचे उघडकीस आले असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत; तसेच आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती गोळा करत असून, कृष्णा आंदेकरसह अन्य आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर याच्यावर गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह तेरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
त्यांच्याविरोधात आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (वय 37, रा. भवानी पेठ) हिने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात आयुषवर गोळ्या झाडल्याचा आरोप असलेला यश सिद्धेश्वर पाटील (वय 19) आणि घटनास्थळी हजर असलेल्या अमित प्रकाश पाटोळे (वय 19, दोघे रा. डोके तालीम पाठीमागे, नाना पेठ) यांची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात दोघा आरोपींना हजर करण्यात आले.
आरोपींनी खुनाचा कट कुठे रचला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, गुन्ह्यामागचा मुख्य उद्देश काय होता, अन्य आरोपींचा ठावठिकाणा कुठे आहे, याबाबत आरोपींची चौकशी करायची असून, अन्य अटक आरोपींनी दिलेल्या माहितीची खातरजमा करायची आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल व गोळ्या कोणी दिल्या, याचा शोध घेऊन शस्त्र व वाहने जप्त करायची आहेत. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी केलेल्या कॉल्सचे विश्लेषण करायचे आहे.
त्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. प्रशांत पवार व ॲड. मनोज माने यांनी बाजू मांडली.
आरोपींना पुरेशी पोलिस कोठडी दिली असून, त्यांनी चौकशीत सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत दहा दिवसांची वाढ केली.