

पुणे: पीएमपी बसच्या माध्यमातून होणारे अपघात रोखणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पीएमपी प्रशासनाने आता कडक पाऊल उचलले असून, बस चालवताना चालक मोबाईलवरती बोलताना किंवा चालकाने हेडफोन लावल्याचे आढळल्यास त्याला थेट निलंबित केले जाणार आहे.
या संदर्भातील आदेश नुकतेच पीएमपी प्रशासनाने काढले आहेत. हा नियम पीएमपीच्या ठेकेदारांकडील चालकांनाही लागू असणार आहे. या निर्णयामुळे आगामी काळात बस चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या चालकांना मोठा चाप बसणार आहे. (Latest Pune News)
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा पीएमपीच्या संचालिका अर्चना गायकवाड यांनी पीएमपी चालकांच्या या बेशिस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गंभीर गोष्टीकडे लक्ष वेधले.
त्यावेळी बैठकीत या बाबत गांभीर्याने चर्चा झाली. त्यानुसार ही कारवाई करण्याचे नियोजन पीएमपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, पीएमपी चालक सातत्याने हेडफोन लावून, मोबाईलवरती बोलत बस चालवत असल्याचे सातत्याने निदर्शनास येते. याशिवाय एका चालकाने फोनच्या नादात एका बसचा अपघात घडल्याचीही घटना या बैठकीत आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितली.
ड्यूटीवर जाण्यापूर्वी मोबाईल होणार जमा
पीएमपीच्या आणि ठेकेदाराकडील चालकांनी (ड्रायव्हर) ड्यूटीवर जाण्यापूर्वी आपले मोबाईल शेड्युल्डवरील वाहकाकडे (कंडक्टर) जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास चालकावर कडक कारवाई केली जाणार आहे. ड्यूटी संपल्यावरच वाहकाकडून चालकाने मोबाईल घ्यावा.
चालक ड्यूटीवर असताना मोबाईल किंवा हेडफोन लावल्याची तक्रार आल्यास त्या बसवरील चालक-वाहकांना तत्काळ निलंबित करण्यात येणार आहे. तसेच, या संदर्भातील कडक सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत, असे पीएमपीचे मुख्य व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.