Nitin Gadkari: लोकमान्यांच्या स्वप्नातील भारतनिर्माणाचे काम जोमाने करू; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
पुणे: लोकमान्य टिळक हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्रोत आणि आदर्श आहेत. त्यांचे कर्तृत्व खर्या अर्थाने व्यासंगी आहे. त्यांच्या नावाने असणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही सन्मानाची बाब आहे.
या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून, लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी येणार्या काळात देशासाठी अधिक जोमाने काम करणार आहे. भारतात पैशांची कमतरता नाही, तर प्रामाणिकपणे काम करणार्या माणसांची कमतरता असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. (Latest Pune News)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार गडकरी यांना शुक्रवारी (दि.1) प्रदान करण्यात आला. या वेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, माजी मुख्यमंत्री तथा ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, टिळकांनी स्वदेशी, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नासाठी प्रामाणिकपणे झटून कार्य करण्याची आवश्यकता आहे. आज आपण अॅटोमोबाईल उद्योगांमध्ये जपानला मागे टाकून अमेरिका आणि चीननंतर तिसर्या क्रमांकावर आहोत. येणार्या काळात, शेती, पायाभूत सुविधा, उद्योग, संशोधन अशा सर्वच क्षेत्रांत देशाला खूप संधी आहेत. आपण प्रयत्नपूर्वक योगदान दिल्यास देशाला पहिल्या क्रमांकावर आणू शकतो.
नितीन गडकरी हे केवळ ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन आफ अॅक्शन’ आहेत. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे अफाट कार्य त्यांनी केले आहे. लोकमान्य टिळकांचा स्वाभिमानी बाणा आधुनिक भारतामध्ये ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा, ही संकल्पनाच अतिशय विलक्षण आहे. लोकमान्यांचा हा बाणा नितीन गडकरी यांच्या अंगी ठायी ठायी दिसतो. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे त्यांचे नेतृत्व आहे. विलक्षण प्रतीभा, त्यासोबत संवेदनशीलता आणि सातत्याने समाजकारणाची प्रेरणा देणारे संस्कार त्यांनी जोपासले आहेत. ते चांगले संशोधक आहेत. कृषी, अभियांत्रिकी, वैद्यक, उद्योग, स्थापत्य आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अफाट आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
लोकमान्य टिळकांनी याच पुण्यातून स्वराज्याचा मंत्र भारतीय जनतेला दिला. ब्रिटिशांनी ‘भारतीय असंतोषचे जनक’ म्हणून, तर महात्मा गांधींनी ‘आधुनिक भारताचे जनक’ म्हणून त्यांना संबोधले आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार गडकरी यांना मिळणे ही अभिमानाची बाब आहे. लोकमान्य टिळकांप्रमाणे गडकरी हे कार्यक्षमता आणि कार्यावर विश्वास ठेवणारे आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवभारताचे स्वप्न प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न करणार्यांपैकी गडकरी एक आहेत. त्यांचे कर्तृत्व पक्षभेद, समाज, धर्म, राजकारण याच्या पलीकडे जाणारे आहे, त्यांच्या कृतीतून याची प्रचिती येते. युती सरकारच्या काळात गडकरींनी मुंबईत बांधलेल्या 55 उड्डाणपुलांमुळे मुंबईत आज वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी मोलाची मदत होत आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
लोकमान्य टिळक परखड विचारांची ठाम भूमिका घेणारे आणि राष्ट्रसेवेची अखंड तळमळ असणारे असामान्य नेते होते. त्यांच्याच विचारांवर चालणार्या गडकरी यांची पुरस्कारासाठी झालेली निवड अत्यंत योग्य आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या गडकरींना पुरस्कार मिळणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. गडकरी हे केवळ यशस्वी राजकारणी नसून प्रयोगशील शेतकरी आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक आहेत. गडकरी हे विकासाच्या विषयावर सतत चिंतन करणारे नेते आहेत. प्रत्येक निर्णय घेताना त्यांचा विचार स्पष्ट असतो आणि निर्णयातही धडाडी दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यांनी पक्षीय राजकारणापुढे जाऊन समाजकारणाकडे लक्ष केंद्रित केले. त्यांचे कार्य इतरांसाठी मार्गदर्शक आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
