फुरसुंगी: महापालिकेच्या कचरा डेपोतील लिचेट (तेलकट आणि चिकट पाणी) फुरसुंगीतील नाल्यामध्ये सोडण्यात येत असल्याने जलप्रदूषण होत आहे. परिणामी, परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, एक प्रकारची ’काळ्या पाण्याची शिक्षा’ भोगावी लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महापालिकेने कचरा डेपोतून नाल्यामध्ये सोडण्यात येणाऱ्या लिचेटचा तातडीने बंदोबस्त करावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. महापालिकेच्या कचरा डेपोमधून चिकट, काळसर आणि तेलकट पाणी फुरसुंगीतील नाल्यामध्ये सोडले जात आहे. (Latest Pune News)
यामुळे दुर्गंधीयुक्त काळे पाणी सध्या या नाल्यातून वाहत आहे. या नाल्यातील पाण्याचा रंगही काळा झाला आहे. परिणामी, दूषित पाण्यामुळे गावात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. परिसरातील जलस्रोत प्रदूषित होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने परिसरातील रहिवासी महापालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत आहेत.
उरुळी देवाची व फुरसुंगी गावच्या हद्दीत असणाऱ्या कचरा डेपोचा त्रास गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ येथील ग्रामस्थ सहन करीत आहेत. सध्या कचरा डेपोचा हा भाग जरी महापालिकेत असला, तरीही या दोन गावांच्या हद्दीला लागून आहे.
शहरातील कचऱ्यावर येथे प्रक्रिया केली जाते. मात्र, नागरी घनकचरा अधिनियमाचा महापालिकेला विसर पडला असून, कचरा डेपोमुळे रहिवाशांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता नाल्याची पाहणी करून लवकरच योग्य ती उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंपणच शेत खात असेल तर...
ओढे-नाले दूषित करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते. परंतु, महापालिकाच नाला दूषित करीत असेल, तर कोणावर कोण कारवाई करणार? तीन लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या दूषित पाण्याचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा; अन्यथा हेच पाणी महापालिकेला भेट देऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वयंभू फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष हरपळे यांनी दिला आहे.
कचरा डेपोच्या लिचेटमुळे परिसरातील जलस्रोत दूषित होत आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना एक प्रकारची काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. महापालिका दरवर्षी कचरा डेपोवर करोडो रुपये खर्च करते, तर मग येथून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याची योग्य विल्हेवाट का लावू शकत नाही?
- संजय हरपळे, माजी उपसरपंच, फुरसुंगी