

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या 'पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजने'साठी महापालिकेने विमा कंपनीला चार वर्षांत साधारण 20 कोटी रुपये प्रीमियम भरला. मात्र, या कालावधीत 160 लाभार्थ्यांना 5 कोटीच लाभ मिळाला आहे. त्यामुळे या योजनेसाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात काहीही तरतूद न करता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमित मिळकतकर भरणार्या मिळकतधारकाच्या कुटुंबासाठी महापालिकेकडून 'पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना' राबविली जाते. या योजनेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना 2018-19 च्या अंदाजपत्रकात तरतूद केली होती.
मिळकतकराचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रामाणिकपणे नियमित कर भरणार्या मिळकतधारकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेंतर्गत पाच लाखांचे अर्थसाहाय्य मिळेल, असा यामागील उद्देश आहे. या योजनेंतर्गत महापालिकेने कर आकारणी झालेल्या मिळकतधारकांचा ग्रुप विमा काढण्यात येत असून, दरवर्षी विमा कंपनीला कोट्यवधी रुपये प्रिमियम भरण्यात येतो. या योजनेत मिळकतधारकांसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश करण्यात आला.
दरम्यान, दरवर्षी जाहिरात काढून विमा कंपनीची नियुक्ती केली जाते. मागील वर्षात 20 कोटी प्रीमियम भरला आहे. मात्र, या कालावधीत 160 लाभार्थ्यांना साधारण 5 कोटींचा लाभ मिळाला. विमा कंपनीला दिल्या जाणार्या विम्याच्या रकमेच्या हप्त्याच्या तुलनेत लाभार्थीच मिळत नसल्याने या योजनेसाठीची अंदाजपत्रकात तरतूदच करण्यात आलेली नाही. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.