

बेलसर; पुढारी वृत्तसेवा : बेलसर-उरुळी कांचन रस्ता हा मागील अनेक वर्षांपासून अनेक समस्यांचा सामना करत आहे. अष्टविनायक महामार्गातील हा मार्ग महत्त्वाचा मानला जात असला तरीही रेंगाळत पडलेले काम, घाईने काम केल्याने रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यामध्ये आलेले महावितरणचे खांब यामुळे अनेक वर्षांपासून हा रस्ता चर्चेत आहे; परंतु प्रशासन याबाबत मूग गिळून गप्प आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग (साईडपट्टी) ही अत्यंत बिकट आहे, त्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
बेलसर फाटा ते शिंदवणे घाटमाथा यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईडपट्टीमध्ये मुरमाव्यतिरिक्त मातीचा भराव केला गेला आहे. या मातीतील अनेक दगड-धोंडे वर आले असून, पादचारीसुद्धा या रस्त्यावरून चालू शकत नाहीत. त्यावर कुठल्याही प्रकारचे रोलिंग केले गेले नाही. यामध्ये मोठे दगड-गोटे, माती आणि मुरूम आहे. परिणामी, भविष्यकाळात पावसामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होईल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करतात.
या रस्त्यावर कोथळे चौक, त्यासोबतच बेलसरमधील चार ठिकाणांवर या 15 दिवसात चार ते पाच अपघात झाले आहेत. अपघातामध्ये अनेक प्रवाशांना आपले हात किंवा पाय गमवावे लागले आहेत; परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही.
बेलसर ग्रामपंचायत यांच्या वतीने गतिरोधक बसवण्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच जेजुरी पोलिस ठाण्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता; परंतु या पत्रास सार्वजनिक बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल प्रशासनाकडून केली गेली नाही.
कोथळे चौक बनला अपघातांचा 'हॉटस्पॉट'
कोथळे चौकामध्ये मागील आठवड्याभरात चार ते पाच छोटे-मोठे अपघात झाले आहेत आणि या अपघातांमध्ये अनेक जणांना गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये लहान-मोठ्या वाहनांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे कोथळे चौक हा अपघातांचा 'हॉटस्पॉट' झाल्याचे दिसत आहे.
रस्त्याबद्दल करावयाच्या दुरुस्त्या आणि गतिरोधक यांच्या सर्व सूचना संबंधित ठेकेदार यांना दिल्या आहेत. पुढील काही दिवसात रस्त्याचे संपूर्ण काम होईल व नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आपण या रस्त्यांवर थर्मोप्लास्टिकचे गतिरोधक बसवणार आहोत. लवकरच तेही काम पूर्ण होईल.
प्रदिप लव्हटे,
कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागबेलसर-उरुळी कांचन रस्त्यावरील गतिरोधक आणि इतर मागण्यांसाठी प्रशासनाकडे आम्ही मागणी केली आहे; परंतु सद्य:स्थितीत रस्त्यावर होत असलेले अपघात हे चिंताजनक आहेत. रस्त्यावर एखाद्या प्रवाशाचा जीव गेला तर त्यास सर्वस्वी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल.
धीरज जगताप, उपसरपंच, बेलसर