पिंपरी : शिक्षणाच्या ओढीने झाली भीक मागण्यापासून मुक्तता…

पिंपरी : शिक्षणाच्या ओढीने झाली भीक मागण्यापासून मुक्तता…

वर्षा कांबळे : 

पिंपरी : निगडी येथील शिक्षिका शाळेतून घरी परतताना त्यांना सिग्नलवर काही मुली भीक मागताना दिसल्या. त्या मुलींनी या शिक्षिकेकडे खायला न मागता वह्या, पुस्तकांची मागणी केली. आम्हाला शाळेत शिकायचं आहे; पण माहिती नाही कधी शिकायला मिळेल. यावर मुलींची शिकायची तळमळ पाहून शिक्षिकेला चैन पडले नाही. यातूनच एक सामाजिक संस्था आणि पोलिस यांची मदत घेऊन नातेवाइकांकडून जबरदस्ती भीक मागणार्‍या मुलीची सुटका करण्यात आली.  सोनालीची (नाव बदलले आहे) शिक्षणाची तळमळ पाहून शिक्षिका तृप्ती कोल्हटकर यांनी सहगामी फाउंडेशनच्या प्राजक्ता रुद्रवार यांच्याशी संपर्क साधला. या मुलीला शिक्षण देऊ शकतो का म्हणून तिचा फोटो दाखविला. फोटो पाहिल्यानंतर प्राजक्ता यांना आठवले की, सोनालीच्या आईने बालकल्याण समितीकडे सोनालीचा ताबा मिळावा, यासाठी केस नोंदवली होती. जवळपास ऑक्टोबर महिन्यापासून सोनालीचा शोध सुरू होता.

सोनालीची आई तिच्या शोधात गेल्या वर्षभरापासून होती. त्यामुळे मुलगी सापडली, याचा खूप आनंद झाला. दुसर्‍या दिवशी निगडी पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक विश्वजित खुळे यांची भेट घेऊन त्यांना ही सर्व माहिती दिली व पोलिसांनी ताबडतोब त्यांच्या टीमला मदत करण्यास सूचना दिली. दोन मार्शल व फाउंडेशनच्या प्राजक्ता व सुधीर करंडे यांनी सोनालीचा शोध घेत सिग्नल गाठला व तेथून पोलिसांनी सोनालीला ताब्यात घेतले. आपल्याला आई मिळणार, हे ऐकून सोनालीला रडू आले. तिने स्वत: पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितला. पोलिसांच्या सहकार्याने सोनियाला माहेर आश्रमात तात्पुरता निवारा दिला. दुसर्‍या दिवशी पोलिसांनी तिला बालकल्याण समितीपुढे सादर केले व तिला तिच्या आईच्या ताब्यात दिले.

यांनतर निगडी पोलिसांनी सोनालीला बालकल्याण समितीपुढे नेले व तेथे या मुलीने नेमके काय घडले ते सारे सांगितले. सोनालीला आईपासून नेल्यानंतर तिला तिचे नातेवाईक भीक मागायला लावत असत. तिची आई तिला शोधत अनेक गावे फिरत होती. पण, हे लोक सारखे गाव बदलून जात होते. त्यामुळे तिचा शोध लागत नव्हता. भीक मागून दररोज साधारण 200 ते 500 रुपये मिळत होते व तो पैसा ते नातेवाईक स्वतःकडे ठेवून घेत. भीक मागण्यासाठी या मुलीला अस्वच्छ ठेवत असत. शिक्षणाची आवड असली तरी सोनाली या सगळ्यांपासून दूर राहिली होती. तिने स्वत: हे सगळे कोर्टात सांगितले व मला शिकायचं आहे. मला भीक मागायची नाहीयं, असे सांगितले. ही सर्व केस समजून बालकल्याण समितीने सोनालीला आईच्या ताब्यात दिले. आता सोनालीला आश्रमात शिकण्यासाठी ठेवण्यात आले आहे.

सोनालीचे आई-वडील विभक्त झाले होते. सोनालीसह तिच्या भावाचा ताबा वडिलांकडे होता. वडिलांनी दुसरे लग्न केले आणि मुलांना नातेवाइकांना देऊन टाकले. नातेवाईक त्यांना भीक मागायला लावतात हे त्यांच्या आईला माहिती झाल्यानंतर तिने मुलाची सुटका केली. मात्र, सोनालीचा शोध लागत नव्हता. कारण, हे लोक एकाजागी राहत नव्हते. अखेर शिक्षिका, माझे सहकारी व पोलिस यांच्या सहकार्याने सोनालीची सुटका झाली.

– प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्षा, सहगामी फाउंडेशन

फाउंडेशनकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही मुलीचा शोध घेतला आणि दुसर्‍या दिवशी बालकल्याण समितीपुढे हजर केले. मुलीने सर्व आपबिती सांगितल्यानंतर मुलीला आईच्या ताब्यात दिले आहे.
– विश्वजित खुळे (पोलिस निरीक्षक, निगडी)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news