सासवड; पुढारी वृत्तसेवा: लम्पी आजाराने सर्वत्र थैमान घातले असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शासकीय पातळीवरून या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लम्पी आजाराला दूध उत्पादकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केले असून, कै. चंदूकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या पुरंदर मिल्क संस्था खळद (ता. पुरंदर) यांनी पुढाकार घेत सुमारे चार हजार जनावरांना या रोगाची मोफत लसीकरण केल्याची माहिती पुरंदर मिल्कचे व्यवस्थापक राजेंद्र मांढरे यांनी दिली. पुरंदर मिल्कचे दररोज सुमारे 40 हजार लिटर दूध आनंदी दूध या नावाने संकलित करून वितरीत केले जात आहे.
संस्थेशी 3 हजार दूध उत्पादक शेतकरी निगडित असून, त्यांच्याकडे सुमारे 8 हजार जनावरे आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संस्थेने मोफत लसीकरण हाती घेतले असून, आतापर्यंत 4 हजार जनावरांना लसीकरण केले आहे. यामध्ये भिवडी, कोडीत, नारायणपूर, पोखर, पिसर्वे, गुरोळी, सासवड, साकुर्डे, शिवरी, मुंजवडी, पारगाव आदी ठिकाणी मोफत लसीकरण सुरू आहे, असे माहिती दूध संकलन विभाग प्रमुख डॉ. अक्षय भिसे यांनी दिली.
पुरंदर मिल्कच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप यांच्या संकल्पनेतून संस्थेशी निगडित असणाऱ्या सर्व जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. लम्पी आजाराला दूध उत्पादकांनी घाबरून जाऊ नये. संस्था तुमच्या सोबत असून आपल्या दुभत्या जनावरांना ताबडतोब लसीकरण करून घ्यावे. यासाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप यांनी
केले आहे.