पिंपरी महापालिकेच्या उद्यानांत विनाशुल्क ‘नो एन्ट्री’; तीन तासांसाठी वीस रुपये तिकीट

संभाजीनगर येथील महापालिकेचे बर्ड व्हॅली.
संभाजीनगर येथील महापालिकेचे बर्ड व्हॅली.
Published on
Updated on

मिलिंद कांबळे
पिंपरी : शहरातील सार्वजनिक उद्याने पालिका व ठेकेदारांच्या खिसे भरण्याचे साधन झाले आहे. प्रवेश, वाहनशुल्क, बोटिंग, लेसर शो, फोटोग्राफी आदींसाठी भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याने पालिका सर्वसामान्यांची आर्थिक लूट करीत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आता शहरातील उद्यानांत विनाशुल्क 'नो एन्ट्री'चे छुपे धोरण पालिकेने अवलंबल्याचे दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी सार्वजनिक उद्यानाची सुविधा उपलब्ध करून देणे हे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे.

उद्याने ही नागरिकांना भरलेल्या करातून उभारले जातात. पालिकेने शहरात तब्बल 159 सार्वजनिक उद्यान उभारले आहेत. आणखी उद्याने विकसित केली जात आहेत. विरंगुळा म्हणून नागरिक सहकुटुंब उद्यानात फिरायला जातात. मोठे आकर्षक असलेले उद्यानासाठी पालिकेने प्रवेशशुल्क लावले आहे. साधारण नागरिक दोन ते तीन तासांचा वेळ उद्यानात घालवितात.

या वेळेसाठी प्रौढांना 20 रुपये तर, बालकांना 10 रुपये तिकीट आहे. एका परिवारात किमान चार सदस्य असतात. त्यांना 60 ते 80 रुपयांचा भुर्दंड केवळ तिकिटांसाठी सहन करावा लागतो. काही खाल्ले तर, खिसाच रिकामा होतो. आर्थिक भुर्दंड बसत असल्याने काही नागरिक अशा उद्यानात जाणे टाळत आहेत. परिणामी, उद्यानांच्या आनंदापासून ते मुकत आहेत.

शुल्क आकारूनही सुविधांची वानवा
महापालिका उद्यान देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, तिकीट काढून उद्यानात गेले तरी, आवश्यक सुविधा चांगल्या नसल्याचे चित्र आहे. स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोणत्याच उद्यानाचे समाधानकारक नाही. सर्वत्र प्रेमीयुगुलांचे चाळे दृष्टीस पडतात. त्याचा लहान मुलांवर विपरित परिणाम होतो.

हिरवळीत व इतरत्र जाणीवपूर्वक चिखल करून ठेवलेला असल्याने उद्यानाचा आनंद घेता येत नाही. टवाळखोरांना सुरक्षारक्षक हटकत नाही. नागरिक या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करतात. तसेच, अनेक उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी उपलब्ध नाहीत. खेळणी असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बालगोपाळांचा हिरमोड होतो. याकडे 'उद्यान विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

वीस रुपयांची अतिरिक्त लूट
बॅर्ड व्हॅली उद्यानाच्या प्रवेश तिकिटात 'लेझर शो' च्या शुल्काचा समावेश असताना अतिरिक्त 20 रुपये घेतले जात आहेत. उद्यानात दररोज शेकडो नागरिक येतात. त्यातील निम्म्या नागरिकांनी उद्यान व लेझर शोचे असे एकत्रित 40 रुपयांचे तिकीट काढल्यास ठेकेदारांच्या खिशात मोठी रक्कम जाते. त्यातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. असे असले तरी, उद्यान विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर, अटल बिहारी वाजपेयी उद्यानात 2 तासांसाठी 20 रुपये शुल्क आहे. तेथे लहान मुलांसाठी खेळणी नाहीत.

शुल्क आकारू नका
नागरिकांसाठी 'श्रीमंत' असलेल्या महापालिकेने उद्याने उभारली आहेत. त्याचा त्यांना आनंद घेऊ द्यावा. उद्यानांना तिकीट लावण्याच्या तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या निर्णयास भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तीव— विरोध केला होता. तो निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. तर, ज्येष्ठ नागरिकांना शुल्क आकारू नये, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी केली आहे.

बॅर्ड व्हॅलीत 'लुटी'चा कार्यक्रम
बॅर्ड व्हॅली उद्यानात प्रवेशासाठी 20 रुपये तिकीट आहे. दुचाकी वाहनांसाठी 5 व कारसाठी 10 रुपये पार्किंग शुल्क आहे. लेझर शो पाहायचा असेल तर, 20 रुपये तिकीट आहे. बोटिंगसाठी प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे. पाण्याची बाटली 20 रुपये, आईस्क्रीम किंवा पॉपकॉनर्चे 50 रुपये असे दर आहेत. चौघा जणांचे एखादे कुटुंब उद्यानात फिरावयास गेल्यास त्यांना किमान 600 रुपयांचा खर्च येतो. हा आर्थिक भार सोसविणारा नसल्याने सर्वसाधारण कुटुंब या उद्यानाचा आनंद घेण्यापासून वंचित राहत आहे. दुसरीकडे, तिकीट काढून उद्यानात येऊनही नागरिकांना मुलाबाळांसमोर प्रेमीयुगुलांचे चाळे पाहावे लागतात. त्यामुळे नागरिक तीव— संताप व्यक्त करीत आहेत.

पालिकेच्या मुख्य नऊ उद्यानांना तिकीट
उद्यान तिकिटाचा दर
(प्रौढ-लहान मुले)
दुर्गादेवी टेकडी, निगडी 10-5
भोसरी सहल केंद्र, भोसरी 10-5
गुलाब पुष्प उद्यान, नेहरूनगर 10-5
बॅर्ड व्हॅली उद्यान, संभाजीनगर
(लेझर शो) 20-10
राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव 20-10
गणेश तलाव, प्राधिकरण 10-5
सावित्रीबाई फुले उद्यान, वाकड 10-5
लक्ष्मीबाई बारणे उद्यान, गुजरनगर 2-1
अटल बिहारी वाजपेयी उद्यान, पूर्णानगर 20-10

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news