पुणे: कोथरूडकरांना मेट्रोने प्रवास करणे अजून सोपे आणि सुरक्षित होणार आहे. कारण, कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरूडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.
पाटील आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत या बसचे रविवारी (दि.14) लोकार्पण करण्यात आले. ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ साठी रिक्षासेवा देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची घोषणाही पाटील यांनी या वेळी केली. (Latest Pune News)
या वेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, विठ्ठल बराटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, मतदारसंघ समन्वयक नवनाथ जाधव, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, वृषाली चौधरी, नगरसेवक जयंत भावे, रिक्षावाला संघटनेचे केशव क्षीरसागर यांच्यासह उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडून दिला जातो. त्यामुळे लोकाभिमुख सेवेची शिकवण असल्याने जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. मेट्रोसाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी आणि मेट्रो प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी रिक्षासेवा देखील सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
अशी उपलब्ध असणार सेवा...
ही फीडर सेवा सोमवार ते शनिवार सुरू राहणार असून, नागरिकांच्या मागणीनुसार, बसचे थांबे निश्चित करण्यात आले आहेत. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली पहिली शटल बससेवा राजाराम पूल-माळवे चौक, वनदेवी-कर्वेनगर, डहाणूकर-कर्वे पुतळा-करिश्मा चौक-एसएनडीटी मार्गावर रोज सकाळी 8.30 ते 1 आणि सायंकाळी 4 ते 8 वेळेत सुरू असणार आहे.