

पुणे: महापालिकेच्या शिक्षण विभागासह विविध खात्यांमधील साहित्य खरेदीची प्रक्रिया राबविणाऱ्या भांडार विभागात ठेकेदारांच्या पात्र-अपात्रतेचा खेळ सुरू असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.
मर्जीतील ठेकेदारांना खरेदीचा ठेका देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी हे नियम धाब्यावर बसवून ठेकेदारांना पात्र-अपात्र ठरवत असल्याचे दक्षता विभागाने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी सलग साहित्य खरेदीच्या तीन निविदा रद्द करून फेरनिविदा राबविण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Pune News)
महापालिकेचे शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना विद्यार्थ्यांसाठीच्या साहित्य खरेदीतील गैरव्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय होता. मात्र, शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर ही साहित्य खरेदीची प्रक्रिया महापालिकेकडे आल्यानंतर त्यामधील गैरप्रकार थांबण्यास तयार नाही.
महापालिकेच्या भांडार विभागाकडून शिक्षण विभागासह सर्वच विभागांमध्ये आवश्यक असलेल्या साहित्यांची खरेदी केली जाते. मात्र, या विभागाकडून मर्जीतील ठेकेदारांना काम देण्यासाठी कशा पद्धतीने पात्र-अपात्रेचा खेळ केला जातोय, हे दक्षता विभागाने साहित्य खरेदीच्या तीन निविदांच्या केलेल्या चौकशीतून उघड झाले आहे.
गत आर्थिक वर्षाच्या तरतुदीतून शिक्षण विभागाने शालेय साहित्य खरेदीसाठी दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यामध्ये एकूण पाच ठेकेदारांनी भाग घेतला होता. भांडार विभागाने या पाच ठेकेदारांच्या पाकिटांची तपासणी करून त्यामधील एसव्हीएस, नमन आणि व्हिक्टरी ऑईल ग्राम उद्योग असोसिएशन या तीन ठेकेदारांना पात्र ठरविले, तर कोलेक्स आणि बसव या दोन ठेकेदारांना पात्र केले होते.
याप्रकरणी भाजपचे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यांनी पात्र ठरत असतानाही काही ठेकेदारांना कशा पद्धतीने अपात्र ठरविण्यात आले आहे, हे निदर्शनास आणले होते. या पत्राची दखल घेत दिवटे यांनी दक्षता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून एकूण पाच निविदांची चौकशी करून त्याबाबत अभिप्राय मागविला होता.
दक्षता विभागाने केलेल्या चौकशीत भांडार विभागाने पात्र ठरविलेल्या कोलेक्स इंडस्ट्रीज आणि बसव इंडस्ट्रीज यांनी निविदा प्रक्रियेत सादर केलेल्या कागदपत्रांत किती गोलमाल केला आहे, हे स्पष्टपणे अधोरेखित करीत अतिरिक्त आयुक्तांना त्यांचा अहवाल सादर केला आहे. त्यात अनेक कागदपत्रे अपुरी असतानाही संबंधित ठेकेदार अपात्र ठरत असतानाही त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
तर, ज्या ठेकेदारांना अपात्र करण्यात आले आहे, त्यांना अपूर्ण कागदपत्रे सादर करण्यासाठी नियमानुसार आवश्यक असलेला वेळ न देताही अपात्र ठरविण्यात आल्याचेही स्पष्ट होत आहे. दक्षताच्या अहवालानुसार अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी तक्रार प्राप्त झालेल्या साहित्य खरेदीच्या सर्व निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भांडार विभागाच्या गैरकारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
भांडारच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी?
दक्षता विभागाने केलेल्या चौकशीत भांडार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मनमर्जी पद्धतीने काम करून अपात्र ठेकेदारांना पात्र केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित निविदा रद्द केल्या तरी चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तक्रारदार तुषार पाटील यांनी भांडार विभागाच्या प्रमुख किशोरी शिंदे यांना क्रीडा विभागासाठी घेतले असून, त्यांनी त्या ठिकाणी कोणतेच चांगले काम केलेले नाही, त्यांना पुन्हा त्यांचेच काम सोपवावे, अशीमागणी करीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.