पुणे : तक्रारी 3,151; गुन्हे फक्त 24; ‘लोन अ‍ॅप’चा धिंगाणा

पुणे : तक्रारी 3,151; गुन्हे फक्त 24; ‘लोन अ‍ॅप’चा धिंगाणा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ऑनलाइन लोन देण्याच्या अ‍ॅपवरून तत्काळ कर्ज मिळत असल्याने अनेक जण ते अ‍ॅप डाउनलोड करून किरकोळ रकमेचे कर्ज घेतात. तसेच, कोणताही जामीनदार, कागदपत्रांची गरज नाही. मात्र, हे कर्ज घेताना ते आपल्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस देत असल्याने त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन लुबाडणूक सुरू होते.

शहरात या वर्षभरात ऑगस्टअखेर 3 हजार 151 तक्रारी सायबर पोलिस ठाण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी केवळ 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अजून एकही आरोपी पकडला गेला नाही. त्यामुळे या सायबर चोरट्यांचे फावते आहे.  लोन अ‍ॅपवरून होणारी बदनामी टाळण्यासाठी एका तरुणीने आपल्या 70 वर्षाच्या आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे यातील खरे वास्तव समोर आले आहे. हे गुन्हे प्रामुख्याने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बंगलोर या ठिकाणच्या कॉल सेंटरमधून येत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथके पाठविण्यात येणार आहेत.

ऑनलाइन कर्ज मिळणार असल्याने अनेक जण लोन अ‍ॅप डाउनलोड केल्यावर त्यातील सर्व अ‍ॅक्सेस संबंधितांकडे जातो. ते तरुण तरुणीच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना मेसेज पाठवून कर्जाची रक्कम भरायला सांगा, असे मेसेज पाठवितात. त्यांच्या फोटो गॅलरीतील फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो बनवून ते त्यांना पाठवितात. त्या इतरांना पाठविण्याची धमकी देऊन पैसे भरायला सांगतात. त्यामुळे अनेक जण बदनामीच्या भीतीने ही बाब कोणाला सांगत नाहीत.

लोन अ‍ॅपवर बंदीचा प्रस्ताव
ज्या लोन अ‍ॅपवरून फसवणूक व बदनामीचे प्रकार झाले आहेत, अशा लोन अ‍ॅपविषयी गुगलला कळवून ते अ‍ॅप काढून टाकण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक मीनल पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news