

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास भाग पाडून एकाची चार लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 6 ते 14 मार्च या कालावधीत मोरवाडी रोड, पिंपरी येथे घडली. विजय कोदंडारामन स्वामिनाथन (64, रा. मोरवाडीरोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी मोबाईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत व्हॉट्सअपद्वारे संपर्क केला. त्यांना मोबाईलमध्ये एक अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले.
तसेच, यूएसडीटी ही क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास भाग पाडून करन्सी एका वेबसाईटवर ट्रान्सफर करायला लावली. त्यानुसार, फिर्यादी यांनी तीन लाख 91 हजार 385 रुपयांची क्रिप्टो करन्सी खरेदी करून आरोपींनी दिलेल्या वेबसाईटवर पाठवली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना त्याचे पैसे न देता फसवणूक केली. दरम्यान, फिर्यादी यांनी याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.