चौदाशे पुणेकर सेक्सटॉर्शनच्या विळख्यात !

चौदाशे पुणेकर सेक्सटॉर्शनच्या विळख्यात !
Published on
Updated on

अशोक मोराळे
पुणे : लोन अ‍ॅपवाल्यांच्या जाचाला कंटाळून दोघा तरुणांनी मृत्यूला कवटाळले, तर लोनचे पैसे भरण्यासाठी एका तरुणीने आपल्या आजीचा खून करून चोरी झाल्याचा बनाव रचला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता सेक्सटॉर्शनच्या विळख्यात अडकून दोघा तरुणांनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे लोन अ‍ॅपबरोबरच सेक्सटॉर्शनचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षातील 13 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दहा महिन्यांच्या कालावधीत एक हजार 445 पुणेकर सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकले आहेत.

महिन्याकाठी सरासरी हे प्रमाण 125 च्या आसपास आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीच्या या गुन्ह्याची व्यप्ती किती मोठ्या प्रमाणात आहे हेच दिसून येते. सोशल मीडियावर मुलींच्या नावाने बनावट खाते तयार केल्यानंतर चॅटिंग करून तरुण मुलांना जाळ्यात ओढायचे. त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉलिंग करून त्यांना अर्धनग्न होण्यास सांगून त्याचे स्क्रीन शॉट काढून किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करायचे असे प्रकार सेक्सटॉर्शनमध्ये केले जातात.

ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने धनकवडी येथील एका तरुणाने 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
त्याने देखील तरुणीच्या धमकावणीनंतर तिला साडेचार हजार रुपये पाठविले होते.

तिच्या सततच्या त्रासामुळे अमोल याने तिला "मै सुसाईड कर रहा हूं" असा संदेश पाठविला होता. त्यावर तिने "करो, सुसाईड मै सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल कर रही हूं" अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सायबर चोरटे विविध बहाण्याने नागरिकांना आर्थिक गंडा घालत होतेच; मात्र आता छळवणुकीत तरुण मृत्यूला कवटाळत आहेत, हे मात्र गंभीर आहे.

मादक अदा पाडतात भुरळ
नागरिकांना गंडा घालण्यासाठी सायबर ठगांनी 'सेक्सटॉर्शन' हा फंडा सुरू केला आहे. यामध्ये फेसबुकवरून सुंदर तरुणी किंवा त्यांच्या नावे बनावट खाते तयार करून चॅटिंग करून टार्गेट फिक्स केले जाते. मोबाईल क्रमांक मिळवल्यानंतर स्वतः नग्न होऊन व्हिडिओ कॉलवर समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढण्यास भाग पाडतात. नग्न तरुणी पाहिल्यानंतर तो व्यक्ती देखील कपडे उतरवण्यास तयार होतो. त्यावेळी तरुणी हळूच व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवते. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ.

तरुणी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करू लागते. बदनामीच्या भीतीने काही जण पैसे देऊन टाकतात. मात्र, पैशांचा तगादा सलग काही दिवस सुरू राहतो. शेवटी आपल्या हातून झालेल्या चुकीचा कोणी तरी गैरफायदा घेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. त्यानंतर ते पोलिसांकडे धाव घेतात. मात्र, आता आत्महत्या सारखे गंभीर प्रकार समोर येऊ लागले आहेत.

एकटे राहणारे अडकतात जाळ्यात..
वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा पूर्ण न होणे, कमी वयात झालेले घटस्फोट अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक सेक्सटॉर्शनला बळी पडत आहेत. विशेषकरून शिक्षण, नोकरीसाठी मोठ्या शहरात आलेल्यांचा यात मोठा समावेश आहे. अलीकडे महिलाही यात गुरफटल्या जात असून, त्यांनादेखील ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. तरुणांचेदेखील या विळख्यात अडकण्याचे प्रमाण अधिक आहे.

हे लक्षातच ठेवा..
योग्य पडताळणी केल्याशिवाय अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
अनोळखी व्यक्तींशी आपला मोबाईल क्रमांक शेअर करू नका.
व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका.
अनोळखी व्यक्तीकडून आधी व्हॉइस कॉल आला असेल आणि नंतर व्हिडिओ कॉलची रिक्वेस्ट येत असेल, तर ती स्वीकारू नका.
अशाप्रकारे कोणी ब्लॅकमेलिंग करीत असेल तर तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत अतिमोकळे होणे टाळले पाहिजे. समोरच्या व्यक्तीचा परिचय असल्याशिवाय मैत्री करणे धोकादायक ठरू शकते. कोणासोबत असा प्रसंग घडल्यास त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय न घेता तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, पोलिस त्यांना योग्य ती सर्व प्रकारची मदत करतील. तसेच अशा प्रकारांबाबत आपल्या घरातील किंवा जवळच्या व्यक्तीसोबत याबाबत बोलणे, मोकळे होणे गरजेचे आहे.
                                                                 -कुमार घाडगे,
                                                              पोलिस निरीक्षक सायबर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news