

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : अवसरी खुर्द येथील अवसरी शासकीय इंजिनियरिंग कॉलेज रस्त्यालगत उत्तम सावळेराम शिंदे यांच्या शेतात उसाची तोडणी चालू असताना ऊसतोड कामगारांना बिबट्याची चार पिल्ले आढळून आली. यामुळे ऊसतोड कामगारांनी भीतीपोटी ऊसतोडणी बंद केली. मंचर-मुळेवाडीमार्गे अवसरी शासकीय रस्त्यालगत मुधारा डोंगराजवळ उत्तम सावळेराम शिंदे यांची भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोड सुरू आहे.
दरम्यान, कामगारांना या तोडीदरम्यान बिबट्याची 4 पिल्ले दिसल्याने त्यांनी ऊसतोड थांबवली. मंचर-मुळेवाडीमार्गे अवसरी शासकीय महाविद्यालयातून मंचरसाठी दररोज 200 ते 300 मुले-मुली पायी ये-जा करतात तसेच मंचरवरून पहाटे व सायंकाळी पाचनंतर 400 ते 500 ज्येष्ठ महिला व पुरुष फिरण्यासाठी येतात. परंतु अवसरी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याने वन विभागाने अवसरी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे यांनी केली.
मंचर येथून अवसरी शासकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी ये-जा करणार्या विद्यार्थ्यांनी व सकाळी फिरायला येणार्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे, आवाहन माजी सरपंच आणि आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर यांनी केले आहे.