

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील राष्ट्रीय छात्र सेनेतील प्रजासत्ताक दिन शिबिरात यंदा प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाचे चार कॅडेट्सची आरडीसी 2024 साठी निवड झाली आहे. आर्मी विंगची ज्युनिअर अंडर ऑफिसर काजल सातपुते ही यंदा कर्तव्यपथावर संचलन करणार आहे. फर्ग्युसन मविद्यालयात द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकत आहे. तिचे वडील निवृत्त शिक्षक आहेत आणि ती मूळची लातूरची आहे. लिडिंग कॅडेट नचिकेत मेश्राम हा नेव्हल युनिटचा कॅडेट असुन त्याची गार्ड ऑफ ऑनरच्या चमूमध्ये निवड झाली आहे व तो ट्रूप कमांडर आहे. तो बीएस्सी द्वितीय वर्षामध्ये शिकत आहे. तो मूळचा भंडार्याचा आहे. कॅडेट कॅप्टन विवेक गांगुर्डे या नेव्हल युनिटचा कॅडेट असून त्याची निवड पीएम रॅलीसाठी झाली असून त्याचा शीप मॉडेलिंग या स्पर्धेतही महत्वाचा सहभाग होता. तो सध्या तृतीय वर्ष प्राणिशास्त्र विभागात शिकत आहे. तर कॅडेट वॉरंट ऑफिसर खुशी झा बेस्ट कॅडेट ठरली असून ती 28 जानेवारीला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते खुशी बॅटन स्वीकारणार आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात यापुढे ही परंपरा अशीच चालू ठेवण्याचा निर्धार प्रथम वर्ष कॅडेट्सनी केला आहे. छात्र सेना अधिकारी सब लेफ्टनंट सुनील होवाळ व लेफ्टनंट डॉ. नंदकुमार बोराडे यांनीही या निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी या कॅडेट्सचे अभिनंदन केले.