ओतूर : सापडलेले ब्रेसलेट प्रामाणिकपणे केले परत; 11 हजारांचे ठरले मानकरी
ओतूर (ता.जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : उंब्रज गावातील मळगंगामातेच्या नौचंडी यज्ञादरम्यान अन्नदान चालू असताना हरिभाऊ वामन हांडे (रा. सोंडेवाडी,उंब्रज) यांच्या हातातील सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट हरवले होते. मात्र, ते उंब्रज विकास सोसायटीतील कर्मचा-यांनी त्यांना प्रामाणिकपणे परत केले. हांडे यांनी ब्रेसलेट हरविल्यानंतर कसोशीने त्या परिसरात शोध घेतला असता त्यांना ते मिळून आले नाही. अखेर कार्यक्रमस्थळी हांडे यांचे ब्रेसलेट हरविले आहे, कुणाला सापडले असेल, तर त्यांनी प्रामाणिकपणे आणून देण्याबाबत माईकद्वारे आवाहन करण्यात आले. हे ब्रेसलेट उंब्रज येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी संतोष चव्हाण यांना सापडले होते.
ते ब्रेसलेट मालकाच्या शोधात असतानाच त्यांनी माईकवरील सूचना ऐकली व ते ताबडतोब माईकजवळ आले. त्यांनी ते ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत देऊ केले. मात्र, ते ब्रेसलेट हरिभाऊ हांडे यांना सुपूर्द करताना चव्हाण यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा गावच्या वतीने रोख रुपये 11 हजार व संपूर्ण पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. सापडलेले ब्रेसलेट मालकाचा शोध घेऊन त्यांना प्रामाणिकपणे सुपूर्द करणार्या चव्हाणांचे अवघ्या पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

